आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरपोहोच गॅस सिलिंडर वितरणाचा बोजवारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - युनिटेक गॅस एजन्सीत घरपोहोच गॅस सिलिंडरसाठी ऑनलाइन बुकिंग करूनही ग्राहकांना बारा-बारा दिवस वाट पहावी लागत आहे. त्यामुळे सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना सकाळी सातपासून गोदामासमोर रांग लावावी लागते.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम व इण्डेन या तीन कंपन्या शहरातील ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करतात. या कंपन्यांचे सुमारे दीड लाखाहून अधिक ग्राहक शहरात आहेत. सर्वच गॅस एजन्सींनी आता ऑनलाइन बुकिंग सुरू केली आहे. तथापि, बुकिंग करूनही ग्राहकांना दोन आठवडे सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागते.

युनिटेक गॅस एजन्सीत ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना मोबाइलवर घरपोहोच सिलिंडर दिल्याचा एसएमएस येतो. प्रत्यक्षात सिलिंडर मात्र येत नाही. एजन्सीत संपर्क केल्यास तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. सिलिंडर हवा असेल, तर गोदामाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीतून घेऊन जाण्याची सूचना ते देतात. त्यासाठी ग्राहकांना भल्या सकाळी येऊन गोदामासमोर रांग लावावी लागते. नंबर आल्यानंतर ग्राहकांना एजन्सीच्या कार्यालयात जाऊन पावती घ्यावी लागते. त्यानंतर गोदामासमोरील मैदानात उभ्या असलेल्या वाहनातून सिलिंडर मिळते.

.. तर कारवाई करणार
युनिटेक गॅस एजन्सीमधील सिलिंडर घरपोहोच करणार्‍या व्यक्तींनी सिलिंडर अन्य ठिकाणी दिल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. सिलिंडर घरपोहोच करणार्‍या त्या लोकांना कामावरून काढण्यात आले आहे. बुकिंगनंतर टाकी मिळाल्याचा एसएमस येतो. मात्र, टाकी मिळत नसेल, तर याची चौकशी करून तातडीने कारवाई करण्यात येईल.’’ सोपान कासार, जिल्हा पुरवठा अधिकारी.

पर्यायी व्यवस्था..
गॅस सिलिंडर घरपोहोच करणार्‍या डिलिव्हरी बॉयने गोंधळ घातला आहे. एकाच वेळी 8 डिलिव्हरी बॉय कामावर येत नसल्यामुळे ग्राहकांना अडचण येऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून पाइपलाइन रस्त्यावरील गोदामामधून सध्या ग्राहकांना सिलिंडर दिले जाते. नवीन डिलिव्हरी बॉय येईपर्यंत ही अडचण जाणवेल. गोदामामधून टाकी घेणार्‍यांना 15 रुपये सवलत देण्यात आली आहे. डिलिव्हरी बॉय कामावर येत नसल्यामुळे ग्राहकांची अडचण होत आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. एजन्सीचा कारभार सुरळीत होईल. तोपर्यंत ग्राहकांनी सहकार्य करावे.’’ विजया फटांगरे, युनिटेक.