आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानित गॅस सिलिंडरच्या दराबाबत ग्राहकांत संभ्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहर व जिल्ह्यातील गॅस ग्राहकांचे अनुदान थेट 1 नोव्हेंबरपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, गॅस सिलिंडरच्या दराबाबत अद्यापही ग्राहकांबरोबरच एजन्सीमध्ये संभ्रामावस्था आहे. सध्या एक सिलिंडर 998.50 रुपये दराने दिला जात आहे. त्यानंतर 435 रुपये ग्राहकांच्या खात्यात अनुदान जमा होत आहे. गॅस सिलिंडरची मूळ किंमत 450 रुपये आहे. परंतु अनुदान जमा होऊनही ग्राहकांना मात्र 109 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

गॅस अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या बँकखात्यावर जमा करण्याच्या योजनेला 1 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. या योजनेला आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजारांहून अधिक ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे. ज्या ग्राहकांनी आधारकार्ड लिंक केलेले नाही, त्यांना आणखी केवळ तीन महिने 450 रुपयांत गॅस सिलिंडर मिळेल. या कालावधीत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास नंतर सिलिंडरसाठी 998.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँकखात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. तसेच अनुदानित सिलिंडरच्या संख्येवरही र्मयादा आणली. प्रारंभी वर्षाला केवळ सहा सिलिंडर अनुदानावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर 9 सिलिंडर देण्यात येणार असल्याचे जाहीर केले गेले. ज्यांच्या नावे गॅस कनेक्शन आहे, त्या व्यक्तीचे आधार कार्ड व आधार प्रमाणित बँकेत खाते बंधनकारक आहे. तशा सूचना जिल्हा पुरवठा विभागाने गॅस एजन्सीचालकांना दिल्या.

टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 1 जूनपासून देशातील 20 जिल्ह्यांत गॅस अनुदानाची योजना सुरू झाली. त्यात महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. ज्या जिल्ह्याची अथवा शहराची आधार कार्ड नोंदणी 85 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे ग्राहकांचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. नगर शहराची आधार नोंदणी 120 टक्के, तर जिल्ह्यातही 85 टक्क्यांपेक्षा जास्त आधार कार्डची नोंदणी झाली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून योजना लागू करण्याचे शासकीय स्तरावरून जाहीर करण्यात आले आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम व इण्डेन या तीन कंपन्या शहरात गॅस सिलिंडरचा पुरवठा करतात. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये एकूण 6 लाख 19 हजार 821, तर नगर शहरात 1 लाख 62 हजार गॅस ग्राहक आहेत. आतापर्यंत शहरातील 50 हजार ग्राहकांना लिंकिंग फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे.