आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्थिव्यंग, मतिमंद गवाजीला मिळाला न्याय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- निराधार असलेल्या सतरा वर्षांच्या अस्थिव्यंग, मतिमंद गवाजी कोते याची कैफियत ‘दिव्य मराठी’त 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर बालकल्याण समितीने त्याची व्यवस्था पाथर्डी येथील मतिमंद मुलांच्या बालगृहात केली.
बालन्याय अधिनियमानुसार बालकांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. तथापि, शासकीय यंत्रणांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात चालढकल होत असल्याचे गवाजीच्या ससेहोलपटीमुळे समोर आले. गवाजीसाठी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाने बालकल्याण समिती, समाजकल्याण विभाग, अपंग कल्याण विभाग, जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा बालसंरक्षण कक्ष यांच्याकडे बालकाचे पुनर्वसन करण्याबाबत पाठपुरावा केला, पण यात यश आले नाही.
गवाजी अस्थिव्यंग, मतिमंद असून त्याचे पालक कचरू काते हे त्याला सांभाळण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे अमृतवाहिनीने त्याला बालकल्याण समितीसमोर हजर केले. गवाजीला तो पूर्वी दाखल असलेल्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अपंग मुलांच्या वसतिगृहात पाठवण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
मात्र, वसतिगृहाच्या मुख्याध्यापकांनी त्याला प्रवेश नाकारला. त्यानंतर संस्थेने बालविकासासाठी काम करणार्‍या संस्थांशी संपर्क साधला. मात्र या संस्थांनीही त्याला प्रवेश दिला नाही. यासंदर्भात संस्थेने जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडे तक्रार केली, तरीही गवाजीला न्याय मिळाला नाही.
गवाजीवर होणार्‍या अन्यायाला ‘दिव्य मराठी’ने वाचा फोडून संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला. समितीच्या अध्यक्ष अँड. लता गांधी यांनी गवाजी याला तातडीने प्रवेश देण्याचे आश्वासन दिले. गेल्या तीन महिन्यांपासून अमृतवाहिनी संस्था व त्याचे पालक कचरू काते यांची गवाजीला वसतिगृहात दाखल करण्यासाठी सुरू असलेली धावपळ त्यामुळे थांबली. समितीने गवाजीला पाथर्डी येथील मुलांच्या बालगृहात दाखल करण्याचे आदेश बालकल्याण समितीने दिले आहेत.