आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मढी विश्वस्त मंडळाला "धर्मादाय'कडून नोटीस, मळी न लावण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ देवस्थान विश्वस्त मंडळाला सहायक धर्मादाय आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. ठराव न करता, तसेच भाविकांना विश्वासात न घेता समाधीला मळी न लावण्याचा निर्णय घेतल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. पूर्वापार चालत आलेली परंपरा बंद करण्याचा निर्णय घेताना ग्रामस्थ व भाविकांना विश्वासात घ्यायला हवे, असे या नोटिसीत म्हटले आहे.
कानिफनाथांच्या समाधीला वर्षातून एकदा वर्षप्रतिपदेला औषधी वनस्पतींचा लेप अर्थात मळी लावण्यात येते. यावर्षी विश्वस्त मंडळाने समाधीला मळी न लावण्याचा निर्णय परस्पर घेतल्याची तक्रार विश्वस्त डॉ. रमाकांत मडकर व त्र्यंबक चव्हाण यांनी केली. या निर्णयाने भाविकांच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले होते. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने निरीक्षकामार्फत या तक्रारीची चौकशी केली. विश्वस्त मंडळाचा ठराव न करता, तसेच ग्रामसभेतही ठराव न घेता परस्पर हा निर्णय घेण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मळी काढताना झुरळे, किडे, पालींची घाण आढळून आल्याने मळी न लावण्याचा निर्णय घेतल्याचे कारण दिले.
मळी लावण्याची परंपरा पूर्वापार चालत आल्याचे निरीक्षण नोंदवत सहायक धर्मादाय आयुक्तांनी अशा परंपराबाबत निर्णय घेताना मढीतील ग्रामस्थ व नाथभक्तांना विश्वासात घेण्याची गरज व्यक्त केली आहे. या परंपरेबाबत संबंधितांची मते जाणून घेऊन निर्णय घ्यावा, तसेच मळी न लावण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी सूचना नोटिसीत देण्यात आली आहे. भक्तांची मते जाणून घेण्यासाठी जाहीर प्रसिद्धीकरण करण्याच्या सूचनाही विश्वस्त मंडळाला देण्यात आल्या आहेत.