आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना सामान्यांसाठी की कंपन्या पोसण्यासाठी..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राजीव गांधी जीवनदायी योजनेची अंमलबजावणी नीट होत नसल्याने संतापलेल्या पालकमंत्री मधुकर पिचड यांनी सरकारी योजना सर्वसामान्यांसाठी आहेत की, कंपन्यांना पोसण्यासाठी, असा सवाल करत जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशी सूचना अधिकार्‍यांना केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या या योजनेच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, आमदार चंद्रशेखर घुले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, सभापती कैलास वाकचौरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार, योजनेचे समन्वयक डॉ. वसिम शेख आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी शेख यांनी योजनेबाबत माहिती दिली. पिचड यांनी ही योजना राबवणारे अधिकारी कुठे आहेत, असा सवाल केला असता शेख यांनी संग्राम सेवा केंद्र व ई-सेवा केंद्राचे अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी मग थेट आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना फोन करून अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून ही काय पध्दत आहे, असा प्रश्न केला. अनुपस्थित अधिकार्‍यांकडून खुलासा मागवण्याची सूचना पिचड यांनी जिल्हाधिकार्‍यांना केली.

जीवनदायीबाबत खासगी रुग्णालयांच्या काय अडचणी आहेत, असे पिचड यांनी विचारले असता नोबल हॉस्पिटलचे डॉ. रवीकांत पाचारणे यांनी लाभार्थींचे विमे तीन वेगवेगळ्या कंपन्यांकडून उतरवण्यात आले आहेत. रुग्ण दाखल झाल्यानंतर या कंपन्या विम्याबाबतची जबाबदारी एकमेकांवर ढकलतात, असे स्पष्ट केले. ते ऐकून पिचड संतापले. सरकारी योजना सर्वसामान्यांसाठी आहेत की कंपन्या पोसण्यासाठी आहेत, असा सवाल करत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना केली.

राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत जास्तीत जास्त कार्डांचे वाटप करावे. मानवतेच्या दृष्टीने ही फार मोठी योजना आहे. जिल्ह्यात विम्यापोटी 6 कोटी रुपये देण्यात आले आहेत. योजनेबाबत मला कुठल्याही तक्रारी नको आहेत. योजना देवभरवशावर नको आहे. दर महिन्याला बैठक घ्या. अधिकार्‍यांनी ही योजना आव्हान म्हणून स्वीकारावी. ज्या रुग्णालयात योजनेचा लाभ मिळणार आहे, त्या रुग्णालयांनी तसे फलक लावावेत, अशी सूचनाही पिचड यांनी केली.

मी त्यातला नाही..
जीवनदायी योजनेच्या प्रसिध्दीवर जोर देण्याची सूचना पालकमंत्री पिचड यांनी जिल्हाधिकारी कवडे यांना करून तुम्ही पत्रकार परिषद घेऊन योजनेची सविस्तर माहिती द्या, असे सांगितले. मला स्वत:ला पत्रकार परिषद घ्यायला आवडत नाही. प्रसिद्धीसाठी हपापलेला मी पालकमंत्री नाही, असे सांगत त्यांनी या आधीचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता टोला मारला.

26 रुग्णालयांत लाभ
योजनेचा लाभ 26 खासगी व शासकीय रुग्णालयात मिळणार आहे. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणारे केशरी व पिवळी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय व अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थींना योजनेचा लाभ मिळेल. 8 लाख 98 हजार 339 लाभार्थी असून, आतापर्यंत 1 लाख 5 हजार कार्डांचे वाटप झाले आहे.’’ डॉ. वसिम शेख, समन्वयक, जीवनदायी योजना