आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्यायी पाणीवाटप नियमांत बदल हवा - माजी मंत्री मधुकर पिचड यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - समन्यायी पाणीवाटपाचे नियम नगर जिल्ह्यावर अन्यायकारक असल्याने त्यात बदल करा, अशी आमची मागणी आहे. परतीचा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना कराव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधणार आहोत, असे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकोले, श्रीगोंदे व नगर शहर या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले. उर्वरित जागांवर पक्षाच्या दिग्गज उमेदवारांनाही पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर पिचड यांनी सर्व तालुकाध्यक्षांची राष्ट्रवादी भवनात भेट घेतली. नंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मेधा कांबळे, सोमनाथ धूत, सभापती शरद नवले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात परतीचा पाऊस न झाल्याने पिकांचे नुकसान झाले असून दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. चारा डेपो, छावण्या सुरू कराव्या लागणार आहेत. यासंदर्भात सर्व तालुकाध्यक्षांशी मी चर्चा केली. कापसाला आणि उसाला समाधानकारक भाव नाही. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला पॅकेज द्यावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

संभाव्य टंचाई विचारात घेऊन उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. सध्या जायकवाडी धरणात सुमारे ४३ टक्के पाणी आहे. हे पाणी त्यांना पिण्यासाठी पुरेसे असल्याने जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी पाणी देण्याची गरज नाही. ज्या नियमानुसार जायकवाडीला पाणी सोडावे लागते, तो नियमच नगर जिल्ह्यावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा नियम बदलावा, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात न्यायालयाने पाण्याच्या निर्णयाचा विषय सरकारकडे सोपवला आहे. त्यामुळे आम्ही आता सरकारकडेच जायकवाडीला पाणी सोडू नये, अशी मागणी करणार आहोत, असे पिचड म्हणाले.
रब्बी पिके जगवण्यासाठी कालव्यातून आवर्तन सोडावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे, असेही पिचड यांनी सांगितले.

पिचड म्हणाले, आमच्या उमेदवारांचा ज्या ठिकाणी पराभव झाला, त्या ठिकाणचे समीक्षण आम्ही करतो आहोत. पुढील काळात पक्ष अधिक मजबुतीने बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

कुणाला बोलायचे ते बोलू द्या, मी जनतेच्या बाजूने...
मंत्री असताना जायकवाडीला पाणी देण्याच्या मुद्द्यावर पिचड काहीच बोलले नाहीत. आता त्यांनी भूमिका बदलली असल्याची टीका होत आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता पिचड म्हणाले, कुणाला काय बोलायचे ते बोलू द्या. माझी भूमिका नेहमीच जनतेच्या बाजूने राहिली आहे.

शरद पवार आज जवखेड्यात
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथे झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवायला हवा. या अमानुष घटनेचा आम्ही निषेध करतो. सोमवारी (१० नोव्हेंबर) सकाळी अकरा वाजता शरद पवार जवखेडे येथे जाऊन दलित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत, असे पिचड म्हणाले.