आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - निसर्गाच्या हातात हात घालून चालणे म्हणजे निसर्गवाद आहे, असे ‘ताओवाद’ सांगतो. ‘ताओवाद’ वाचणारे लोक वेडे होतात असे म्हटले जाते. पण, वेडेपणा हीच शहाणपणाची सुरुवात असते. कारण वेडी माणसेच जग घडवतात, असा आजवरचा इतिहास आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी गुरुवारी सायंकाळी येथे केले.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशनच्या वतीने धार्मिक परीक्षा बोर्ड येथे भगवान महावीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कांबळे यांच्या ‘चला डोक्याने चालू’ अर्थात ‘ताओवाद’ या विषयाने व्याख्यानमालेला सुरुवात झाली. ते म्हणाले, ताओवाद म्हणजेच निसर्गवाद आहे. त्यामध्ये निसर्गावर आक्रमण करायला शिकवले जात नाही, तर निसर्गावर प्रेम करुन निसर्गासोबत राहण्याची शिकवण त्यात आहे. पायाने चालणे व डोक्याने चालणे यामध्ये फरक आहे. कोणत्याही विद्यापीठात ज्ञान मिळत नाही, तर पदव्या आणि माहिती मिळते. पण, ताओवाद ज्ञानी व्हायला शिकवतो. कारण जेथे ज्ञानाचा सुकाळ असतो, तेथे पदव्यांचा दुष्काळ असतो. पण, आजकाल आपण पदव्यांनाच ज्ञान समजतो. आपण मरणाला घाबरतो म्हणून आपण मरण नाकारतो व सुरक्षितता शोधतो. पण शहाणी माणसे आनंदाने मरण स्वीकारतात. कारण जिवितकार्य आनंदाने पूर्ण केल्यानंतर येणारा मृत्यू आनंददायी असतो, असेही कांबळे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.