आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahapalika Commissioner Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांनी मनपाकडे मागितला चौकशीसाठी अधिकारी, आरसीसीचे काम न करताच बिल काढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अस्तित्वात नसलेल्या ठिकाणी आरसीसी पाइपगटाराचे काम कागदोपत्री दाखवून गैरव्यवहार केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी महापालिका आयुक्ताकडे चौकशीसाठी अधिकारी देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी गेल्या आठवड्यात जाकीर शेख यांनी फिर्याद दिली असून माहितीच्या अधिकारात मागवलेले पुरावे त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
फिर्यादीत म्हटले की, अमरधामसमोरील जनकल्याण रक्तपेढी परिसरात म्हसोबा मंदिर ते पावन गणपती मंदिराच्या कोपऱ्यादरम्यान ६०० मिलिमीटर व्यासाच्या आरसीसी पाइपगटाराचे काम झाल्याचे दाखवण्यात आले आहे. सन २०११-१२ च्या मागास क्षेत्र विकास निधीतून हे काम झाल्याचे दर्शवण्यात आले. नोव्हेंबर २०१२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली. ई-निविदेच्या माध्यमातून ए. बी. शेख या ठेकेदाराला काम देण्यात आले. साडेतीन लाख रुपये निविदा किमतीच्या तुलनेत ठेकेदाराची २ लाख ७४ हजारांची निविदा मंजूर करण्यात आली. तत्कालीन शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी ठेकेदाराशी कामाबाबत नोव्हेंबर २०१३ मध्ये स्टँपपेपरवर करारपत्र केले. कामाच्या बांधकाम साहित्याची चाचणी शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांकडून करण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये प्रत्यक्ष कामाची पाहणी केल्याचे पत्र प्राचार्यांकडून शहर अभियंत्याला देण्यात आले. आयुक्तांच्या मंजुरीनंतर कामाचा २ लाख ७४ हजार निधी ठेकेदाराला अदा करण्यात आला.
संबंधित परिसरात म्हसोबा मंदिर अस्तित्वात आहे. मात्र, पावन गणपती मंदिरच अस्तित्वात नाही. मनपा अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून गैरव्यवहार केला आहे. शाखा अभियंता आर. जी. सातपुते, तत्कालीन शहर अभियंता कुलकर्णी, तत्कालीन प्रभाग अधिकारी अशोक साबळे, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, आयुक्त विजय कुलकर्णी, ठेकेदार शेख, तत्कालीन मुख्य लेखा अधिकारी प्रदीप शेलार व शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य या सर्वांनी संगनमत करून नागरिकांची फसवणूक करत कामाच्या निधीत गैरव्यवहार केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.

दरम्यान, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मण काळे यांनी महापालिका आयुक्तांना २३ सप्टेंबर रोजी पत्र पाठवून शेख यांच्या या तक्रारीच्या चौकशीसाठी अधिकारी द्यावा, अशी मागणी केली आहे. या पत्रावर तातडीने कार्यवाहीची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
अन्यथा न्यायालयात दाद
अस्तित्वात नसलेल्या ठिकाणी काम दाखवून कामाची रक्कम संगनमताने लाटण्यात आली. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या सर्व पुराव्यानिशी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार्यवाही न झाल्यास न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. जाकीर शेख, तक्रारदार.