आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवारामुळे महाराष्ट्र हेडमास्तर बनेल - अण्णा हजारे यांचा विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र पुन्हा देशाच्या जलसंधारणचा हेडमास्तर बनेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी व्यक्त केला.
राळेगणसिध्दी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जलसंधारण रोहयो सचिव प्रभाकर देशमुख,जिल्हाधिकारी अनिल कवडे, विभागीय कृषी सहसंचालक विजय इंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, सरपंच जयसिंग मापारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, दिलीप देवरे, विलास नलगे आदी यावेळी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, गावाची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त आहे. जगाचा विकास करायचा असेल, तर शाश्वत विकास व्हायला हवा. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून असा शाश्वत विकास होईल. एकेकाळी महाराष्ट्र अन्य राज्यांचा हेडमास्तर होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात मरगळ आली होती. त्यामुळे महाराष्ट्र मागे पडला. आता राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे आशेचा किरण दिसू लागला असून, महाराष्ट्र पुन्हा हेडमास्तर होईल. हे अभियान देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. गरीब-श्रीमंत दरी दूर करण्यासाठी, देशाची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी, खेड्यातील ग्रामस्थांचा उद्धार होण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरेल. अभियान यशस्वी होण्यासाठी पाणलोटाची बांधणी करावी लागेल. पळणाऱ्या पाण्याला चालवता आले पाहिजे. चालणाऱ्या पाण्याला थांबवता आले पाहिजे. या अभियानाबाबत लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक असून, ग्रामसभेला विश्वासात घेऊन कामे झाल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात, असे ते म्हणाले.

देशमुख म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून गावाचा कायापालट होणार आहे. यात नरेगाचा सहभाग घेताना निवडलेल्या गावांपैकी किमान एका गावामध्ये पंधरा लाख रूपयांची कामे आपण जलसंधारणातून घेऊ शकताे. नगर जिल्हा एवढा पुढारलेला असताना सर्वाधिक टँकरने येथे पाणीपुरवठा करावा लागतो, हे कमीपणाचे लक्षण आहे, याचा विचार सर्वांनीच करावा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कवडे यांनी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या अभियानाची माहिती दिली. प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार डॉ. विनोद भामरे, दत्तात्रेय भावले, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, बाळासाहेब कांबळे, दत्ता आवारी आदी यावेळी उपस्थित होते. राळेगणसिद्धी येथील कार्यक्रमात जलयुक्त शिवार अभियानाचे माहितीपत्रक अण्णा हजारे यांना देताना जिल्हाधिकारी अनिल कवडे. समवेत रोहयोचे सचिव प्रभाकर देशमुख आदी.
बातम्या आणखी आहेत...