आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महाराष्ट्र जलसुधार’अंतर्गत 15 कोटी खर्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महाराष्ट्र जलसुधार प्रकल्पांतर्गत कृषी व्यवसायावर आधारित उपक्रमांवर सात वर्षांत सुमारे 15 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या माध्यमातून प्रयोगशील शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, अशी माहिती आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक संभाजी गायकवाड यांनी दिली.

महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पांतर्गत शेतीवर आधारित विविध उपक्रम राबवले जातात. यात शेळीपालन, कुक्कुटपालन, गांडूळ खत, मिनी डाळ मिल, दुग्धउत्पादन, रेशीम उद्योग, बियाणे सफाई व पॅकिंग, स्पिरुलिना शेडनेट हाऊस, टिशुकल्चर प्रयोगशाळा, गुळ व काकवी प्रकल्पासह इतर उपक्रमांचा समावेश आहे.

गायकवाड म्हणाले, हा प्रकल्प सन 2005-06 पासून कार्यान्वित करण्यात आला. त्यावर आतापर्यंत 15 कोटी 6 लाख रुपये अनुदान खर्च करण्यात आले. निवड केलेल्या सिंचन प्रकल्प क्षेत्रात उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून उत्पादन वाढवणे, शेती व शेतीशी निगडित मृद व जलसंधारण, ग्रामविकास, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, कृषी पणन आदी विभागांत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. 2012-2013 या वर्षात 45 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

यात प्रामुख्याने मुळा, घोड, कुकडी व घाटशीळ पारगाव हे सिंचन प्रकल्प राबवले गेले. याचा फायदा राहुरी, नेवासे, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत व र्शीगोंदे या सात तालुक्यांना झाला आहे.

जलक्षेत्र सुधार प्रकल्पाची 103 कृषी विज्ञान मंडळे असून याची आत्मा प्रकल्पात नोंदणी आहे. विज्ञान मंडळातर्फे सामूहिक बाजारपेठ, पाण्याचा नियोजनबद्ध वापर, तसेच उत्पादनवाढीबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येते. याबाबतचा अहवाल राज्यस्तरावर तयार करण्यात येत आहे, असे गायकवाड म्हणाले.