आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"महाराष्ट्र केसरी'ची तयारी अंतिम टप्प्यात, गुरुवारपासून वाडिया पार्कमध्ये रंगणार कुस्तीचे सामने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वाडिया पार्कवरील छबूराव लांडगे क्रीडानगरीत गुरुवारपासून (25डिसेंबर) होणाऱ्या 58 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आखाड्याचे काम पूर्ण होत आले आहे. पुण्याच्या बालेवाडी येथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट मागवण्यात आले आहेत. नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहण्याची संधी या स्पर्धेनिमित्त नगरकरांना मिळणार आहे.
पुणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक सल्लागार विलास कचरे यांनी रविवारी मैदानाची पाहणी केली. त्यांच्या सूचनेनुसार मातीचा आखाडा व मॅटला अंतिम स्वरूप देण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, पोलिस उपअधीक्षक वाय. डी. पाटील, निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे, राम नळकांडे, उपमहाराष्ट्र केसरी संदीप बारगुजे आदी या वेळी उपस्थित होते. 24 डिसेंबरला सर्व जिल्ह्यातील संघ नगरमध्ये दाखल होतील. महाराष्ट्र केसरीचा वजन गट वगळता पाच ते सात वजन गटांत अजिंक्यपदाच्या स्पर्धा होणार आहेत. माती व मॅट अशा दोन गटांत वेगवेगळ्या स्पर्धा होणार असून महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत मॅटवर होणार आहे. स्पर्धा भव्य-दिव्य होण्यासाठी जिल्हा तालीम संघाने जय्यत तयारी केली आहे.

सुरक्षेबाबत अधिक सतर्कता
राज्यात प्रतिष्ठेच्या असलेल्या या स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्पर्धेला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडे चोख बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तसे आश्वासनही मिळाले आहे. चुकीचे निकाल लागू नयेत, यासाठी प्रत्येक कुस्तीचे विविध अंगांनी चित्रीकरण करण्याची खबरदारीही घेण्यात येणार आहे.'' वैभव लांडगे, अध्यक्ष, जिल्हा तालीम संघ.