नगर - तब्बल ३५ वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा बहुमान यावर्षी नगर शहराला लाभला आहे. २५ ते २८ डिसेंबरदरम्यान वाडिया पार्क क्रीडा संकुलात ही स्पर्धा रंगणार आहे. शहराला हा बहुमान देत असल्याची अधिकृत घोषणा राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
जिल्हा तालीम संघ व पहिलवान छबू लांडगे प्रतिष्ठानच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. वाडिया पार्क येथे छबू लांडगे क्रीडानगरीवर २५ ते २८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत ३३ जिल्हा व ११ महापालिका असे ४४ संघ सहभागी होणार आहेत. ४४ संघांचे ७०४ मल्ल प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत. २४ डिसेंबरला स्पर्धेत सहभागी मल्ल शहरात दाखल होतील. पहिल्या दिवशी वजन निश्चित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्पर्धेचे उद््घाटन होणार आहे.
उद््घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री विनोद तावडे, कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, ऑलिंपिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार यांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती बाळासाहेब लांडगे व जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी दिली.
पुणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, परिषदेचे तंत्रज्ञ दिनेश पुंड, संदीप बारगोजे, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, तात्या वाडेकर, छबूराव जाधव, दत्तात्रेय अडसुरे, नामदेव लंगोटे, अंजली देवकर-वल्लाकट्टी, जितेंद्र वल्लाकट्टी, धनंजय जाधव अादी या वेळी उपस्थित होते.
नव्या नियमानुसार स्पर्धा
* जागतिक संघटनेकडून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नवीन वजनी गट लागू करण्यात आले आहेत. आता ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ९७ किलो वजनी गटात ग्रीको रोमन, तर ८६ ते १२५ किलो वजनी गटात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. नगरची कर्मभूमी असलेल्या छबू लांडगे यांनी एकेकाळी कुस्तीचे मैदान गाजवले आहे. त्यांच्या स्मृतिनिमित्त नगरची निवड केली.”
बाळासाहेब लांडगे, सरचिटणीस, कुस्तीगीर परिषद
आतापासूनच तयारी
*स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा तालीम संघाने आतापासूनच कंबर कसली आहे. स्पर्धेशी संबंधित विविध समित्यांची स्थापना लवकरच करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी मल्लांसमवेत पंच, पदाधिकारी, नामवंत मल्ल असे ११५० जण स्पर्धेसाठी येतील. त्यांची व्यवस्था करण्यासाठी या समित्या काम करतील. नगरला या स्पर्धा घेण्याचा मान दिल्याबद्दल परिषदेचे आभार मानतो.”
वैभव लांडगे, अध्यक्ष, जिल्हा तालीम संघ.