आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरचा प्रताप गायकवाड उत्तर महाराष्‍ट्र केसरी; अमित गाडे उपविजेता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगरच्या अमित गाडे याच्यावर मात करत नगरचाच प्रताप गायकवाड रविवारी उत्तर महाराष्‍ट्र केसरी ठरला. तीन विरुद्ध एक गुणाने त्याने ही कुस्ती जिंकली. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे व पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
जिल्हा तालीम संघाच्या वतीने वाडिया पार्क क्रीडा संकुलातील पैलवान छबुराव लांडगे क्रीडानगरीत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या 11 व्या उत्तर महाराष्‍ट्र केसरी स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. उत्तर महाराष्‍ट्र केसरीसाठी अमित व प्रताप यांच्यात लढत झाली. पहिल्या दोन मिनिटांत अमितने एक गुणाची कमाई करत आघाडी घेतली. उर्वरित चार मिनिटांत तीन गुणांची कमाई करत प्रतापने ही कुस्ती जिंकली. दोघेही नगरच्या राजे संभाजी कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे मल्ल आहेत. या कुस्त्या मॅटवर खेळवण्यात आल्या. राजेंद्र चोपडा यांच्या वतीने उत्तर महाराष्‍ट्र केसरी ठरलेल्या प्रतापला एक किलो चांदीची गदा देण्यात आली. मातीच्या आखाड्यात काही प्रेक्षणीय लढती झाल्या. महेश वरूटे याने विकास जाधव याला, तर गौरव गणोरे याला अमोल लंके याने आस्मान दाखवले.

हिंद केसरी 25 सेकंदांत चीत !
लांडगे प्रतिष्ठानच्या वतीने अडीच लाख रुपयांसाठी शेवटची निकाली कुस्ती हिंदकेसरी युद्धवीर राणा व कोल्हापूरचा मल्ल बाला रफिक शेख यांच्यात झाली. मातीच्या आखाड्यात कुस्तीला सुरुवात झाली. बालाने सुरुवातीलाच युद्धवीरवर कब्जा मिळवला. अवघ्या 25 व्या सेकंदात दुहेरी पटाचा डाव टाकत बालाने युद्धवीरला अस्मान दाखवत ही कुस्ती जिंकली अन् कुस्तीप्रेमींनी एकच जल्लोष केला.