आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena, Latest News In Divya Marathi

मनसेचे वसंत लोढा पुन्हा भाजपच्या वाटेवर ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ज्येष्ठ नेते वसंत लोढा पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना जिल्हाध्यक्षपद देण्याची तयारी सुरू आहे. मात्र, पक्षातील एका गटाने त्यांना जिल्हाध्यक्षपद देण्यास विरोध दर्शवला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर भाजपला जिल्हाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
शहराचा विकास होत नसल्याची खंत व्यक्त करत लोढा काही महिन्यांपूर्वी मनसेत दाखल झाले होते. देशात सध्या मोदी व भाजपची लाट असल्याने लोढा यांना पुन्हा भाजपमध्ये परतीचे वेध लागल्याची चर्चा आहे. भाजपमधील काही निष्ठावंतांनी त्यांना पुन्हा पक्षात यावे, अशी गळ घातली आहे. भाजपला ‘जय श्रीराम’ करणारे लोढा मागील काही दिवसांपासून मनसेत अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. लोढा पुन्हा आपल्या घरी (भाजपमध्ये) येण्यास इच्छुक असले तरी अद्याप यावर निर्णय झालेला नाही. त्यातच जिल्हाध्यक्षांविना लोकसभा निवडणूक लढवणारा भाजप आता सक्षम जिल्हाध्यक्षांच्या शोधात आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे अ‍ॅड. प्रताप ढाकणे हे राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यांच्या प्रवेशाला जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला, तरी भाजपला अजूनही जिल्हाध्यक्षपदासाठी सक्षम नेतृत्व मिळाले नाही. आता लोढा यांची भाजपमधील प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. खासदार दिलीप गांधी हे लोढा यांना जिल्हाध्यक्षपद देण्यास इच्छुक आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. अभय आगरकर, भीमराव फुंदे यांचीही नावे चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर भाजप जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय होईल, अशी शक्यता आहे.

अजून तरी मनसे सोडण्याचा विचार नाही
भाजपमधील गटबाजीला कंटाळून पक्ष सोडला नाही. शहराचा विकास व्हावा, परिवर्तन व्हावे, यासाठी पक्ष सोडला होता. अविकसित नगरचा विकास झाला पाहिजे. ही माझी भूमिका होती. भाजपमधील बरेच कार्यकर्ते पुन्हा पक्षात यावे, यासाठी गळ घालत आहेत. अजून तरी मनसे सोडण्याचा विचार केलेला नाही. मनसेतच काम करण्याची ईच्छा आहे.’’ - वसंत लोढा, ज्येष्ठ नेते, मनसे.