आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena News In Marath, Raj Thackeray, Divya Marathi

‘राजाज्ञा’ न झाल्याने मनसे अखेरपर्यंत तटस्थच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार नव्हते. निवडणुकीत कोणाचा प्रचार करायचा, याबाबतही वरिष्ठ पातळीवरुन अखेरपर्यंत कोणतेच आदेश आले नाहीत. शिवाय इतर पक्षांचा प्रचार केला, तर शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, हा धाकही होताच. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारापासून अखेरपर्यंत अलिप्तच राहिले.


जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीसंबंधी वरिष्ठांकडून कोणतेच आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत मनसेने कोणालाही पाठिंबा दिला नाही. काही दिवसांपूर्वी लोकशासन आंदोलनाचे नेते व अपक्ष उमेदवार कोळसे यांच्या प्रचारासाठी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अँड. अनिता दिघे जामखेडला गेल्या होत्या. संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिघे यांनी मनसे कोळसे यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या भूमिकेमुळे मनसैनिक संभ्रमात पडले.


तथापि, अँड. दिघे यांच्या भूमिकेला इतर पदाधिकार्‍यांनी दुजोरा दिला नाही. त्यामुळे त्याही नंतर प्रचारापासून अलिप्त राहिल्या. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यसाठी मनसेचे निवडून आलेले खासदार त्यांच्या पाठीशी असतील, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. पण नगरमध्ये भाजपचा उमेदवार असूनही पक्षादेश नसल्यामुळे मनसैनिक तटस्थच राहिले. मंगळवारी भाजप उमेदवार दिलीप गांधी यांनी मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांची भेट घेतली, परंतु अखेरच्या दिवशीही मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात उतरले नाहीत.


इतर पक्षांचा प्रचार केला, तर कारवाईची धास्ती
कोणाचा प्रचार करायचा, याबाबत आमच्या पक्षप्रमुखांकडून कोणतेही आदेश आले नाहीत. त्यामुळे मनसेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते तटस्थ राहिले. जर मनसैनिक इतर पक्षांच्या व्यासपीठावर अथवा प्रचारात दिसले, तर पक्षभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा धाकही सर्वांच्या मनात होता. मतदारसंघातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे व अपक्ष उमेदवार पाठिंबा मिळवण्यासाठी संपर्क साधत होते, पण वरिष्ठ पातळीवरून कोणताही थेट आदेश न आल्यामुळे आम्ही या लोकसभा निवडणुकीत अखेरपर्यंत तटस्थच राहिलो.’’ सचिन डफळ, जिल्हा संघटक, मनसे.