आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदा : बदल्यांमुळे पोलिसांत ‘थोडी खुशी, जादा गम’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा पोलिस दलात सध्या विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. या बदल्यांमुळे काही कर्मचा-यांमध्ये खुशीचे वातावरण असले, तरी अनेकांची निराशा झाली आहे. मनपसंत ठिकाणी विनंती बदली होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे नाराज कर्मचा-यांची संख्या अधिक आहे. विनंती बदलीसाठी अर्ज करणा-या बहुतांश उमेदवारांचे म्हणणे पोलिस अधीक्षकांनी ऐकून घेतले. परंतु सर्वांची इच्छित स्थळी बदली करणे त्यांना शक्य झाले नाही.

पोलिस दलात मेच्या अखेरच्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. अनेकजण महामार्गावरील जाण्या-येण्याच्या दृष्टीने सोयीचे, तसेच शहरी भागातील पोलिस ठाणे मिळावे,अशी अपेक्षा बाळगून होते. प्रशासकीय बदल्या करताना कर्मचा-यांनी सूचवलेल्या पोलिस ठाण्यांच्या यादीला गौण स्थान असते. प्रशासन त्यांच्या सोयीनुसार बदल्या करते. या प्रक्रियेत अनेक कर्मचा-यांच्या बदल्या लांब झाल्या आहेत. विनंती बदलीसाठी पूर्वी तीन वर्षे एकाच पोलिस ठाण्यात सेवा होण्याची अट होती. राज्य शासनाने यावर्षी विनंती बदलीसाठी 5 वर्षांपेक्षा अधिक सेवेची अट लागू केली. इच्छित स्थळी बदली न मिळाल्यामुळे कर्मचा-यांमध्ये नाराजी आहे. काही कर्मचा-यांनी बदलीसाठी कुटुंबीयांचे मधुमेह, अर्धांगवायू, रक्तदाब आदी आजारांचे प्रमाणपत्र जोडले आहे. पण त्यापैकी बहुतांश जणांची दखल घेतली गेली नाही.

तिस-यांदा त्याच तालुक्यात
मुख्यालयात नेमणुकीला असलेल्या एका पोलिसाने यापूर्वी दोन वेळा अकोले तालुक्यात काम केले आहे. तरीही त्याची यावर्षी पुन्हा अकोले तालुक्यात बदली झाली. काही कर्मचा-यांनी आपण स्थानिक तालुक्यात सेवेत असल्यामुळे आपली बदली करावी, अशी मागणी केली. स्थानिक रहिवासी असलेल्यांना त्याच तालुक्यात काम करता येत नाही, तरीही त्यांची अद्याप बदली झालेली नाही.
पदभारासाठी प्रतीक्षा...
काही अधिकारी जिल्ह्यात नव्याने आले आहेत. परंतु काही पोलिस ठाण्यांच्या अधिका-यांनी आपला पदभारच सोडलेला नाही. त्यामुळे त्यांच्या जागी नियुक्ती मिळालेल्या नव्या अधिका-यांना आधीचे अधिकारी केव्हा पदभार सोडतात, याची वाट पहावी लागत आहे. कर्जतहून अकोले येथे बदली झालेले एक पोलिस निरीक्षक सध्या नियंत्रण शाखेत अशीच प्रतीक्षा करत आहेत.