आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेसिडेन्शिअल अवॉर्डने डॉ. कांकरिया यांचा गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- "स्त्रीजन्माचे स्वागत करा', "बेटी बचाओ' या राष्ट्रीय चळवळीच्या कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकरिया यांना महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे विशेष प्रेसिडेन्शिअल अ‍वॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा समारंभ पुण्यातील मॅस्टाकॉन राज्यव्यापी वैद्यकीय परिषदेत झाला. "इमा'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जितेंद्र पटेल यांच्या हस्ते व राज्य अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास राज्य सचिव डॉ. जयेश लेले, पुढील वर्षाचे अध्यक्ष डॉ. राठोड, पुण्याचीस इमाचे अध्यक्ष डॉ. हबळे, तसेच राज्यभरातून आलेले डॉक्टर उपस्थित होते.
कायद्याच्या कडक अंमलबजावणीबरोबरच सकारात्मक सामाजिक परिवर्तन होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. कांकरिया यांनी ११ कलमी कृती कार्यक्रम तयार केला असून तो देशभरात राबवला जात आहे. डॉ. कांकरिया यांच्या प्रेरणेने हजारो गावांतील ग्रामसभेत स्त्रीजन्माच्या स्वागताविषयीचा ठराव झाला. शेकडो नकोशी मुली हवीशी झाल्या, अनेक सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये हजारो वधू-वरांनी आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा घेतला. राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणामध्येही चांगला प्रतिसाद लाभत आहे. नवजात बालिकेसाठी कन्याजन्म आनंद सोहळा व फिक्स डिपॉझिट योजना सुरू झाली. अनेक विद्यापीठांना सोबत घेऊन युवापिढीमध्ये सजगता निर्माण केली. ए एन सी ट्रॅकिंग व सामुदायिक डोहाळ जेवणातून मुलीच्या जन्माचे स्वागत व कुपोषणमुक्त भारत हा विचार जनमाणसात रूजू लागला. इंडियन मेडिकल असोसिएशन व शासनाच्या सहकार्याने कायद्याचे जागरण प्रभावीपणे होऊ लागले. सामुदायिक शपथ, प्रतिज्ञेच्या माध्यमातून अनेक महिला, युवती मेळावे यशस्वीरित्या झाले. त्यांच्या बेटी बचाओ कार्यासाठी राज्यस्तरीय प्रेसिडेन्शिअल अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल राज्य इमाचे उपाध्यक्ष डॉ. शेख निसार, नगरचे अध्यक्ष डॉ. विलास जोशी, सचिव डॉ. मिलिंद पोळ, डॉ. तवर, डॉ. दीपक, डॉ. विजय देशपांडे, डॉ. रझिया शेख यांनी डॉ. कांकरिया यांचे अभिनंदन केले.
डॉ. कांकरिया यांची पुस्तके मार्गदर्शक
डॉ. सुधा कांकरिया यांनी विपुल लेखनही केले आहे. स्त्रीजन्माचे स्वागत करा, मार्गदर्शिका, प्रिय गोडुलीस, बेटी नही तो बहु कहाँसे लाओगे? ही त्यांची पुस्तके मार्गदर्शक ठरत आहेत. महाराष्ट्रात हळूहळू मुलींची संख्या वाढत आहे. या यशामध्ये डॉ. सुधा कांकरिया यांचा मोलाचा वाटा आहे.