आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र छेडछाडमुक्त व्हावा, खासदार सुप्रिया सुळे यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: नगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवाच्या सांगता समारंभात युवतींशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे. छाया : कल्पक हतवळणे.
नगर - मुली व महिलांना सध्या छेडछाडीचा मोठा त्रास होतो आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच छेडछाडमुक्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवाचा सांगता समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण खासदार सुळे व माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार अशोक काळे, ज्ञानेश्वर पांडुळे, चैत्राली काळे, अॅड. शारदा लगड, घनश्याम शेलार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, प्राचार्य डॉ. बी. के. कराळे, डॉ. भाऊसाहेब औटी, प्रा. संजय नगरकर आदी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, मी ज्या कॉलेजमध्ये होते, त्या कॉलेजमध्ये एकही खासदार आला नाही माझे भाग्य म्हणावे लागेल. कारण भाषणे ऐकूण बोअर होते. संसदेतही भाषणे ऐकताना एकच गोष्ट वारंवार ऐकल्यानंतर मी कंटाळते. मग मी दिवसभरातील प्लॅनिंगचा विचार करायला सुरुवात करते. माझ्या घरात मुलगी किंवा मुलगा असा कोणताही भेदभाव नाही. माझ्या वडिलांना १४ भावंडे. पण वडिलांनी त्यांच्या लग्नाच्यावेळी एकच अपत्य असावे, अशी अट घातली होती. कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन आईने नव्हे, तर माझ्या वडिलांनी केले, असे त्यांनी सांगितले.

आमच्या भागात टोप्या दिसत नाहीत, पण नगरमध्ये आल्यानंतर टोप्या दिसल्या. हा एक सांस्कृतिक बॅलेन्स आहे. आपल्याला इंग्रजी व हिंदीची गरज अाहे, पण मला मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. पण संवाद साधण्यासाठी इतर भाषांचीही गरज असते. दिल्लीत असताना मला हिंदी बोलावे लागते. प्रश्न विचारताना कधीही घाबरायचे नाही, कारण आपल्याला प्रश्नाचे उत्तर मिळते. जास्तीत जास्त चांगल्या लोकांनी राजकारणात यायला हवे.
बलात्कारासारखे प्रकार घडत आहेत. छेडछाडीचा त्रासही वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच छेडछाडमुक्त करायला हवा. छेडछाड हा गंभीर प्रश्न आहे. आयुष्यात दोन प्रकारचे मार्ग असतात - एक वाईट आणि दुसरा चांगला. प्रत्येकवेळी निर्णय घेताना थोड्यावेळ विचार नक्की करा. म्हणजे तुम्ही योग्य मार्गानेच जाल. पुढचा भारत तुम्हाला चालवायचा आहे, असे सुळे म्हणाल्या.

निंबाळकर म्हणाले, महिलांवर अन्याय व अत्याचार वाढत आहेत, हे समाजाचा समतोल बिघडल्याचे निदर्शक आहे. चांगले लोक जोपर्यंत हिरिरीने पुढे येत नाहीत, तोपर्यंत यात बदल होणार नाही. तांत्रिकदृष्ट्या प्रगती होत असल्याचे दिसत असले, तरी आहेरे व नाहीरे या दोन वर्गात मोठी दरी निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. बी. के. कराळे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. संजय नगरकर यांनी केले. यावेळी विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ओबामा का आले?
आपल्याकडे मध्यमवर्गीयांची संख्या मोठी आहे. बराक ओबामा भारतात आले, ते मोदींच्या प्रेमापोटी आले नव्हते, तर त्यांना मध्यमवर्गीयांना अमेरिकेची उत्पादने विकायची आहेत, म्हणून ते आले होते, अशी टिप्पणी माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी केली.

पत्नीचे नाव काय?
बराक ओबामा यांच्या पत्नीचे नाव काय, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थिनींनी केला. अनेक विद्यार्थिनींनी त्याचे बरोबर उत्तर दिले. त्यानंतर खासदार सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे नाव विचारले असता या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.