आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtrian Tradition News In Marathi, Nagar, Vasudev, Divya Marathi

वासुदेवाची दान पावलं आता हरवत चालली..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘अवो शंकराच्या नावानी, अवो पांडुरंगाच्या नावानी..
सकाळच्या रामपार्‍यामंदी, वासुदेवाचे लेकरू आलं..’
धर्म पावला, दान पावलं असं म्हणत बासरी आणि टाळ वाजवत भल्या पहाटे नाचत येणारा वासुदेव आता दिसेनासा झाला आहे. ‘दात्याला दान पावलं’ म्हणणारी वासुदेवाची गाणी अखेरच्या घटका मोजत आहेत.


जुन्या काळात मराठी मुलखातील खेडोपाडी येणारी पहाट मोठी देखणी असायची. घराघरातून जात्यावरची गाणी म्हणत धान्य दळणार्‍या महिला, गल्लीगल्लीत खांद्यावर कावड घेऊन आडावरून पाणी आणणारी गडीमाणसं अन् त्याच वेळी डोक्यावर मोरपिसांची उभट टोपी घातलेला, अंगात विशिष्ट प्रकारचा झगा, पायात घुंगरू, हातात टाळ आणि बासरी घेऊन गाणं म्हणत नाच करणारा वासुदेव दिसायचा.


अंगणात वासुदेव आला म्हणजे भाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे. त्याचे दर्शन घडले की लहान मुले आनंदून जात. बायका माणसे सुपातून जोंधळे घालत आणि दान करत. पुरुष माणसे दुंडा पैसा देऊन त्याला नमस्कार करत. वासुदेवही दान पावलं म्हणत अंगणात नाच करी. सारे अंगण जसे काही समाधानाने आनंदून जाई.


वासुदेवाची गाणी ऐकण्यासारखी असत. ‘चांगुणाच्या घरी शंकर आले भोजनाला’, ‘सत्त्वशील माउली टाळूनी वचनाला’, ‘स्वस्थ बसा स्वामी मन करूनी धीर..’ अशा गाण्यांमधून देवादिकांच्या कथा सांगितल्या जात. ‘पंढरीच्या विठोबाला, कोंढणपुरात तुकाबाईला, सासवडमंदी सोपानदेवाला, जेजुरीमंदी खंडोबाला, आळ्या बेल्यात ग्यानबाला, भीमाशंकरी महादेवाला, मुंगी पैठणात नाथमहाराजाला..’, अशा गाण्यांतून देवादिकांचे नामस्मरण होई. ‘तुळस वंदावी वंदावी, मावली संतांची सावली’, ‘तुळसी ऐसे लावता रोप, पळूनी जाती सगळे दोष,’ अशी आरोग्यदायी तुळसीची महती सांगितली जाई.


‘रामहरी भगवान, भजावे मुखी राम, खोटी वासना सोडूनी द्या, पन देवाचे चरण धरा, आई बाप घरची काशी मानुनी त्यांचे चरण धरा..’, असे मानवी जीवनाला आवश्यक अशा उत्तम प्रकारच्या सद्विचारांचीही महती सांगितली जाई. आता या वासुदेवांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. वासुदेवाचं रूप घेऊन दान पावलं म्हणत दान मागणारी परंपरा काळाच्या ओघात लुप्त होऊ पाहत आहे.


परंपरा सुरू राहावी
वासुदेवाची परंपरा आमच्या चौथ्या पिढीपासून आजतागायत सांभाळली आहे. आमचा समाज पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात आढळतो.आम्ही वर्षातून फक्त फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीतच वासुदेवरूपात बाहेर पडतो. इतर काळात आमचे इतर व्यवसाय सुरू असतात. नागपूर, गोवा, बेळगाव, अमरावती, गोंदियासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आम्ही जातो. शासनाकडून आर्थिक मदत नको. मात्र, ही परंपरा जतन व्हावी यासाठी योग्य ती पावले उचलावीत.’’ संजय किसन साळुंके व लक्ष्मण संभाजी साळुंके, वासुदेव, मेदड.

चित्रीकरण व्हावे
महाराष्ट्रात पांगूळ, भूते, मसणजोगी, गोंधळी, गोसावी अशा अनेक परंपरा आहेत. बदलत्या काळात या समाजातील नव्या पिढय़ांनी नवीन व्यवसाय स्वीकारले आहेत. या समाजातील नव्या पिढीला दारोदार फिरून दान मागण्याची लाज वाटते. आता पूर्वीसारखे दानही मिळत नाही. त्यामुळे या परंपरा नष्ट होऊ लागल्या आहेत. या लोकपरंपरांचे जतन होणे गरजेचे आहे. शासनाने मंडळ तयार करून या परंपरांचे चित्रीकरण करून ठेवावे. जेणेकरून पुढील पिढय़ांना या परंपरा पाहता येतील.’’ प्रा. धोंडीराम वाडकर, भाषा अभ्यासक, अहमदनगर महाविद्यालय.