आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi National Rural Employment Guaranty Scheme, Scam At Ahmednagar

रोहयो गैरव्यवहार : न्यायालयात फिर्याद देणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- रोहयोमधील रस्त्याच्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तत्कालीन शाखा अभियंता आर. बी. महामुनी यांना निलंबित करून कार्यालयीन अधीक्षकावर गुन्हा दाखला करावा, अशी मागणी राहुरी येथील अरूण वाबळे यांनी कार्यकारी अभियंता पी. पी. खंडागळे यांच्याकडे करून न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

श्रीगोंदे तालुक्यातील वांगदरी ते चिंभळा रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी निलंबन आदेशच बजावण्यात आला नाही. ‘दिव्य मराठी’ने 5 जानेवारीला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. नुकत्याच झालेल्या जि. प. स्थायी समितीच्या सभेत याचे पडसाद उमटले. त्यावेळी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी या प्रकरणाची फाईल समोर ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. याप्रकरणी वाबळे यांनी शाखा अभिंयत्याचे निलंबन करून हा आदेश गहाळ केल्याप्रकरणी कार्यालयीन अधीक्षक आर. व्ही. हुसळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी महामुनी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. परंतु हा आदेश बजावला गेला नाही. हुसळे यांनी निलंबनाचा आदेश एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या तोंडी सूचनेवरून गहाळ केला. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी अधिकाराचा वापर करून हुसळे यांच्याविरुद्ध शासकीय कामात कसूर केल्याप्रकरणी, तसेच शासकीय कागदपत्रे गहाळ केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. शाखा अभियंता महामुनी यांचे निलंबन करून हुसळे यांच्याविरोधात फिर्याद द्यावी; अन्यथा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात येईल, असा इशारा वाबळे यांनी दिला.

पळवाटा शोधण्याचा प्रयत्न
निलंबनाचा आदेश न बजावल्यामुळे अडचणीत आलेल्या अधिकार्‍यांनी पळवाटा शोधण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. निलंबनाचा आदेश रोखण्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनीच तोंडी सूचना दिल्या होत्या, असे काही अधिकार्‍यांकडून नाव न घेण्याच्या अटीवर सांगण्यात आले. जर निलंबनाचा आदेश थांबवायचा होता, तर तात्पुरता स्थगिती आदेश त्याचवेळी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी का दिला नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

टेबलांची अदलाबदली
बांधकाम विभागातील चौकशी टेबलची जबाबदारी वरिष्ठ सहायक अफताब देशमुख यांच्यावर होती. एक महिन्यापूर्वी ही जबाबदारी महेश नाईक यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यामुळे पुन्हा या टेबलची जबाबदारी कार्यालयीन अधीक्षक हुसळे यांनी देशमुख यांच्याकडे सोपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.