आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi's Death Anniversary Occasion Remembrance

"गांधी' तेव्हा देशाची भाषाच झाली होती, प्रा. रतनलाल सोनग्रांनी जागवल्या आठवणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अमेरिकेतील अटलांटा येथील मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांच्या भव्य स्मारकाच्या दर्शनी भागात महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. त्याला अभिवादन करताना मला स्मरली क्रांतिकारक पृथ्वीसिंह आझाद यांनी सांगितलेली आठवण... हे सांगत होते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा.
प्रा. सोनग्रा नुकतेच अमेरिकेच्या दौ-यांवरून परतले. या दौऱ्यात त्यांनी आवर्जून मार्टिन ल्यूथर किंग यांच्या स्मारकाला भेट दिली. मार्टिन ल्यूथर किंग यांनी गुलामांच्या मुक्तीचा मोठा लढा उभारला. त्यामागे प्रेरणा गांधी होते, असेे सांगून प्रा. सोनग्रा म्हणाले, स्मारकाच्या समाेरच गांधीजींचा पुतळा आहे. शिवाय त्यांच्या वस्तूंचे स्वतंत्र दालनही आहे. त्यांनी वापरलेली चप्पल, चरखा, थाळी तिथे ठेवण्यात आली आहे. गांधीजींचे जीवनदर्शन तिथे पर्यटकांना घडते.

स्वातंत्र्य चळवळीत "गांधी' ही स्वतंत्र भाषाच झाली होती, असे सांगून प्रा. सोनग्रा यांनी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीसिंह आझाद यांनी नगरच्या भेटीत सांगितलेल्या आठवणीला उजाळा दिला. १९६८ मध्ये पृथ्वीसिंह आझाद जिल्हा वाचनालयातील कार्यक्रमासाठी नगरला आले होते. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. ब्रिटिश सरकारने पृथ्वीसिंह यांना पकडले होते. पोलिस त्यांना आंध्रप्रदेशातील राजमहेंद्रीच्या कारागृहात घेऊन चालले होते. रेल्वे गोदावरी नदीवरील पुलावरून जात असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन पृथ्वीसिंह यांनी चालत्या गाडीत पुलावरून उडी मारली. पाण्यातून सुखरूप बाहेर आल्यानंतर जवळच्या खेड्यात ते आश्रयासाठी गेले, पण हातातील बेड्या पाहून त्यांना गुन्हेगार समजून सगळेजण दार बंद करून घेऊ लागले. पृथ्वीसिंह यांना रशियन, फ्रेंच, इंग्लिश, हिंदी अशा सगळ्या भाषा येत होत्या, पण आंध्रतील तेलुगू येत नसल्याने ते काय म्हणतात हे गावकऱ्यांना कळत नव्हते. शेवटी जहाल विचारांचे क्रांतिकारक असलेल्या पृथ्वीसिंह यांनी "गांधी', "गांधी' म्हणायला सुरुवात केली. ते ऐकताच झोपडीचे दार उघडले गेले. तेथील खेडूत महिलेने पृथ्वीसिंह यांना आश्रय दिला. केवळ "गांधी' या शब्दामुळे मी त्या दिवशी वाचलो, असे पृथ्वीसिंह यांनी सांगितले.