आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावीर कलादालनाची महापालिकेकडून उपेक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्टेशन रस्त्यावरील महापालिकेचे महावीर कलादालन सध्या समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. उड्डाणपुलासाठी कलादालनाच्या आवारातील 108 चौरस मीटर जागेचे संपादन करण्यात आले, परंतु भूसंपादनाच्या मोबदल्यात मिळालेला सुमारे 9 लाखांचा निधी प्रशासनाने दुसरीकडेच खर्च केला आहे. त्यामुळे हे कलादालन नूतनीकरण व इतर सुविधांपासून वंचित राहिले आहे.

प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यांनी काढलेले ‘सारे जहाँसे अच्छा’ हे भव्य पेन्सिलचित्र पाहण्यासाठी, तसेच मोफत सार्वजनिक वाचनालयामुळे अनेकजण या कलादालनात येत असतात. या ठिकाणी विविध प्रकाशकांची पुस्तक प्रदर्शने वर्षभर सुरू असतात. मात्र, मनपा प्रशासनाने कलादालनाच्या इमारतीकडे व तेथील सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. काही महिन्यांपूर्वी स्टेशन रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रुंदीकरण करण्यात आले. त्यासाठी भूसंपादन करून संबंधितांना मोबदला देण्यात आला आहे. महावीर कलादालनाच्या आवारातील 108 चौरस मीटर जागेचे संपादन करण्यात आले, त्याबदल्यात मनपाला बांधकाम विभागामार्फत सुमारे 9 लाखांचा मोबदला देण्यात आला. हा निधी कलादालनाच्या इमारतीवर व तेथील सुविधांवर खर्च होणे अपेक्षित होते. मात्र, मनपा प्रशासनाने निधी मिळाल्यानंतर कलादालनाकडे ढुंकूनही पाहिले नाही. भूसंपादनात इमारतीची संरक्षक भिंत पाडण्यात आली. ती बांधण्याची तसदीही मनपाने घेतली नाही.

कलादालनाच्या देखभालीसाठी एका शिपायाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु संरक्षक भिंत पडल्याने इमारतीची सुरक्षा धोक्यात आली आहे. भिंतीबरोबरच समोरील बाजूस असलेले कारंजेही तोडण्यात आले आहे. भूसंपादन होऊन अनेक महिने उलटले, तरी इमारतीसमोरील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. नालीतून वाहणारे सांडपाणी, तसेच वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमधून वाट काढत पुस्तकप्रेमींना कलादालनात प्रवेश करावा लागतो. कलादालनातील स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली आहे. वेगळ्याच कलांचे दर्शन तेथे घडते.

9 लाख वित्तविभागात जमा
भूसंपादनाच्या मोबदल्यात सार्वजनिक बांधकामकडून मनपाला सुमारे 9 लाख रुपये मिळाले आहेत. हा निधी वित्त विभागाकडे जमा करण्यात आला आहे. मिळालेला निधी कलादालनाच्या इमारतीसाठी खर्च करायचा की अन्य कामासाठी, हा आमचा अधिकार नाही. ’’ विश्वनाथ दहे, नगररचनाकार.

प्रशासनाचे दुर्लक्ष
महावीर कलादालनाची स्थिती काही प्रमाणात चांगली असली, तरी संरक्षक भिंत पाडण्यात आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भूसंपादनाच्या मोबदल्यात मिळालेला निधी कलादालनावर खर्च होणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ’’ कमलेश दारकुंडे, पुस्तकप्रेमी.