आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘महावितरण आपल्या दारी’ कडून निराशा; जामखेडचे शेतकरी अद्याप वीजजोडणीच्या प्रतीक्षेतच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड - राज्य सरकारने शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी तातडीने वीज कनेक्शन मिळण्यासाठी ‘महावितरण आपल्या दारी’ ही योजना चार वर्षांपूर्वी राबवली. या योजनेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, गेली चार वर्षे प्रतीक्षा करण्याशिवाय शेतकर्‍यांपुढे पर्याय उरला नाही. येथील कंपनीच्या कार्यालयात याबाबत विचारणा करण्यासाठी शेतकरी येत असल्यामुळे या योजनेची ‘शेतकरी महावितरणच्या दारी’ अशी अवस्था झाली.
‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी वीजपंपाचे कोटेशन भरल्यानंतर विजेच्या खांबासाठी वेगळे पैसे आकारले जात नव्हते. केवळ वीजपंपानुसार कोटेशन भरून शेतकर्‍यांना वीज कनेक्शन घेणे शक्य होते. चार वर्षांपूर्वी या योजनेला प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील 3881 शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत कोटेशन भरले. मात्र, त्यानंतर शेतकर्‍यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्यावर्षी या योजनेंतर्गत 541 शेतकर्‍यांना, तर चार महिन्यांपूर्वी 316 शेतकर्‍यांना वीज कनेक्शन देण्यात आले. अद्यापही 3024 शेतकरी कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. सन 2010 मध्ये शेतकर्‍यांकडून वीजपंपाचे कोटेशन भरून घेताना 4 महिन्यांत कनेक्शन दिले जातील, असे सांगण्यात आले. परंतु अद्याप शेतकर्‍यांना वीजजोड मिळाला नाही.
चार वर्षांत काम झाले नाही
४या योजनेंतर्गत 16 नोव्हेंबर 2010 रोजी वीजपंपासाठी कोटेशन भरले. त्यावेळी चार महिन्यांत काम होईल, असे सांगण्यात आले. परंतु अद्याप काम पूर्ण झाले नाही. याबाबत अनेकवेळा विचारणा केल्यानंतर ठेकेदार नाही, असे उत्तर मिळते. वीज वितरण कंपनीने आम्हा शेतकर्‍यांची कुचंबणा केली आहे.’’
प्रमिला दगडू सुरवसे, शेतकरी, जवळा.
माहिती घेऊन कार्यवाही
४या योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांना वीज कनेक्शन दिले गेले नसले, तर याबाबत माहिती घेतो. आॅर्डर बॅलन्स असेल, तर याबाबत विचारणा करून तातडीने कार्यवाही करण्यात येईल.’’
डी. एन. भोळे, कार्यकारी अभियंता.
पंधरा दिवसांत कनेक्शन
४‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत राहिलेल्या शेतकर्‍याना येत्या 15 दिवसांत वीज कनेक्शन देण्यास सुरुवात होईल. ठेकेदाराला तशी आॅर्डर केली आहे.’’
सुरेश कुर्‍हाडे, सहायक अभियंता, वीज वितरण कंपनी उपविभाग, जामखेड.