आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनाचे तास वाढताहेत, संपूर्ण राज्यात 'अ ते ग' गटात भारनियमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पुरेशी वीज उपलब्ध असतानाही मंगळवारी संपूर्ण राज्यभरात अ, ब, क, ड, ई, फ, ग-1, ग-2 आणि ग-2 या सर्व गटांत भारनियमन करण्यात आले. विशेष म्हणजे अ ते क गट भारनियमनमुक्त असतात. मात्र, वीज यंत्रणेत बिघाड झाल्याने भारनियमन करावे लागत असून अशीच परिस्थिती अजून दोन दिवस राहणार आहे, असे महावितरणच्या अधिका-यांनी सांगितले.
राज्यात 16 हजार 300 ते 16 हजार 400 मेगावॅट इतकी विक्रमी वीज उपलब्ध असल्याचे महावितरणने सोमवारी (29 सप्टेंबर) स्पष्ट केले होते. मात्र, सद्य:स्थितीत विजेच्या मागणीत झालेली वाढ आणि पुरवठ्यातील तफावत यामुळे मुख्य कार्यालयाकडून सर्व गटातील फीडरवर भारनियमन करण्याच्या सूचना आल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे नवरात्रोत्सवातच गेल्या तीन दिवसांपासून दोन टप्प्यांत सहा ते सात तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मंगळवारी अ, ब, क, ड, ई, फ, ग-1, ग-2 आणि ग-2 या सर्व गटांत भारनियमन करण्यात आले. याबाबत महावितरणशी संपर्क साधला असता, तांत्रिक बिघाडामुळे भारनिमयन करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती अजून दोन दिवस राहणार आहे. हा तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दूर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

'अ ते क' ला फटका
भारनियमनासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग-1, ग-2 आणि ग-2 असे 9 गट आहेत. ज्या फीडरची वाणिज्य वितरण हानी कमी आहे, ग्राहक नियमित वीजबिल भरतात, असे फीडर अ ते क गटात ते भारनियमनमुक्त आहेत. मात्र, मंगळवारी अ, ब, क या फीडरवरही भारनियमन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये महावितरणबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
आंदोलनाचा इशारा
नगर शहरातील विजेचे भारनियमन तातडीने बंद न झाल्यास मनसेचा उद्रेक होईल, असा इशारा शहराध्यक्ष गिरीश जाधव, नितीन भुतारे, रोहन शेलार, राजू कानडे यांनी कार्यकारी अभियंता बापूसाहेब गोरे यांना निवेदनाद्वारे दिला. महापौर संग्राम जगताप यांनीही मंगळवारी अधीक्षक अभियंता दत्तात्रेय कोळी यांची भेट घेऊन भारनियमन रद्द करण्याची मागणी केली.