आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदी घालूनही जिल्ह्यात ‘महिको’ बियाणांची विक्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महिको कंपनीच्या बियाणे विक्रीवर बंदी घातल्याची घोषणा केली. तथापि, याबाबत लेखी आदेश जिल्हा कृषी कार्यालयाला मिळाला नसल्याने सध्या तरी या कंपनीचे बियाणे कृषी सेवा केंद्रांतून सर्रास विकले जात आहे.
आमदार उत्तम ढिकले यांनी बुधवारी (11 जुलै) विधानसभेत बियाणांचा गैरव्यवहार करणार्‍या कंपन्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यावर मंत्री विखे यांनी वरील घोषणा केली. त्यामुळे शेतकरीवर्गात खळबळ उडाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये महिको बियाणाला विशेष पसंती दिली जाते. मात्र, वितरकांकडून बियाणांचा काळा बाजार होत असल्याचे आढळल्यामुळे कंपनी अडचणीत सापडली आहे.राज्यात महिको बियाणांवर बंदी घातल्याची घोषणा कृषिमंत्र्यांनी केली असली, तरी याबाबत स्पष्ट आदेश जिल्हा कृषी कार्यालयाला मिळालेले नाहीत. त्यामुळे कृषी सेवा केंद्रात सध्या उपलब्ध असलेल्या महिको बियाणांवर बंदी घालायची की, हा निर्णय पुढील वर्षापासून लागू होणार याबाबत अधिकार्‍यांमध्ये संभ्रम आहे.
मंत्र्यांनी बंदी नेमकी केव्हापासून याचे स्पष्टीकरण करणे आवश्यक होते, अशी चर्चा बियाणे विक्रेत्यांमध्ये आहे. याबाबत कृषी विभागाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विजय घावटे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.
बियाणे विक्री थांबवावी - महिको कंपनीच्या बियाणावर राज्यभरात बंदी घातली आहे. परंतु सध्या कृषी सेवा केंद्रांतून या बियाणांची विक्री सुरू आहे. ही विक्री तत्काळ थांबवणे आवश्यक आहे.’’ उत्तमराव ढिकले, आमदार, नाशिक.
बंदीच्या निर्णयाने शेतकर्‍यांचे नुकसान - महिको बियाणांना शेतकरी वर्गातून मागणी आहे. चांगले व अधिक उत्पादन देणारे महिकोचे वाण आहे. सरकारने बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकर्‍यांचे व व्यापार्‍यांचे नुकसान होणार आहे.’’ छबूराव हराळ, महिको बियाणे वितरक.