आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कास्ट्राईब महासंघाचे आज राज्यस्तरीय अधिवेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (29 डिसेंबर) नगरला होत आहे. या अधिवेशनास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सहा मंत्री उपस्थित राहणार होते. मात्र, महासंघाचे विद्यमान अध्यक्ष एन. एम. पवळे यांनी हे अधिवेशन बेकायदेशीर असून आपण अधिवेशनाला उपस्थित राहू नये, असे पत्र मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांना दिल्याने मंत्र्यांच्या उपस्थितीबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, अधिवेशनाला मंत्री उपस्थितीत राहिल्यास त्यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा पवळे यांनी शनिवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला.

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी शहरातील टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते होणार होते. अधिवेशनासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, समाज कल्याणमंत्री शिवाजीराव मोघे, पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल, रोहयोमंत्री नितीन राऊत, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, प्रधान सचिव पी. एस. मीना, माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, आमदार सुधीर तांबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे आदी उपस्थित राहणार होते. मात्र, महासंघाचे विद्यमान अध्यक्ष एन.एम. पवळे यांनी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार्‍या मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांना अधिवेशन घेणारे गुन्हेगारी प्रवृतीचे असून, आपण या अधिवेशनाला उपस्थित राहू नये, असे पत्र दिले. त्यामुळे आता या मंत्र्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, अधिवेशनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत, असे महासंघाचे महासचिव विलास बोर्डे यांनी शनिवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

मंत्री येणारच नाहीत
आयोजकांमधील काहीजणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांची महासंघातून हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अधिवेशनासाठी उपस्थित राहणार्‍या सर्व मंत्र्यांना आपण अधिवेशनाला उपस्थित राहू नये, याबाबत पत्रे दिली आहेत. त्यामुळे अधिवेशनाला मंत्री येणार नाहीत. उपस्थित राहिल्यास त्यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करू.’’ एन. एम. पवळे, राज्याध्यक्ष, कास्ट्राईब महासंघ.

संघटनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये आहे अध्यक्षपदावरून वाद
नगर शहरात कास्ट्राईबच्या नावावर राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. महासंघात कुठल्याही पदावर नसलेल्यांनी हे अधिवेशन बोलावले आहे. अधिवेशनाचे आयोजक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यातील काही पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहू नये, असा आरोप एन. एम. पवळे यांनी केला होता. त्यानंतर कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष व अधिवेशनाचे आयोजक अरुण गाडे यांनी राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या महासचिवपदावरून पवळे यांची हकालपट्टी केली आहे. कास्ट्राईबचा पवळे यांच्याशी कुठलाही संबध नाही. आरोप करून ते अधिवेशनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले होते. महासंघाच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच गाजण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री उद्घाटन करतील
नंदनवन लॉन येथे रविवारी सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. सकाळच्या पहिल्या सत्रात सकाळी 9 ते साडेअकरा या कालावधीत शाहिरी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. दुसर्‍या सत्रात महासंघाची बैठक व चर्चासत्र होणार आहे.’’ विलास बोर्डे, महासचिव.