आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त मेजर गाडीलकर यांचा शौर्यपदक देऊन सन्मान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जम्मू-काश्मिरमध्ये पुलवामा जिल्ह्यात कार्यरत असताना दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालणारे सेवानिवृत्त मेजर ऋषिकेश नामदेव गाडीलकर यांना सेनापदक (वीरता) बहाल करण्यात आले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत झाशी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सदर्न कमांडचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.

29 ऑगस्ट 2011 रोजी पुलवामा जिल्ह्यातील एका घरात अतिरेकी लपले होते. 3, राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीत कंपनी कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळणार्‍या मेजर गाडीलकर यांनी या दोन्ही अतिरेक्यांना यमसदनी धाडले. आम्हाला टीप मिळताच त्वरित हालचाली करून नियोजनबरहुकूम आम्ही दहशतवाद्यांना ठार केले. आमच्या कंपनीतील एकही जवान जखमी झाला नाही, याचे समाधान पुरस्कारापेक्षा मोठे आहे, असे मेजर गाडीलकर म्हणाले.

मेजर गाडीलकर हे निवृत्त कृषी अधिकारी नामदेवराव गाडीलकर (प्रोफेसर कॉलनी) यांचे चिरंजीव आहेत. या सन्मानाबद्दल मेजर गाडीलकर यांचे महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकरराव शिंदे, केशवराव गाडीलकर हायस्कूल व सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.