आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या मान, सन्मानाच्या रक्षणाची जबाबदारी जवानांवर - मेजर राजेश बावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - देशाच्या मान, सन्मानाचे रक्षण करण्याची जबाबदारी जवानांवर आहे. त्यांची शिस्त व वर्तनावर रेजिमेंटची शान अवलंबून असते. त्यासाठी वेळ पडल्यास जवान आपल्या प्राणांचीही पर्वा करणार नाहीत, असा विश्वास मुंबई सब एरियाचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल राजेश बावा यांनी मंगळवारी व्यक्त केला.
नगरच्या मॅकेनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये जवानांच्या दीक्षांत संचलनात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘जवानांनी अनुक्रमे सैन्य धर्म, मानव धर्म व आपल्या खासगी धर्माचे निष्ठेने पालन करावे. सध्या देशाला फक्त सीमेबाहेरच्या शत्रूंपासूनच धोका नाही. काही फुटीर शक्तीही देशाला धोका निर्माण करीत आहेत. जवानांना सर्व शक्तीनिशी त्यांचा मुकाबला करावा लागणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही लोकांना मदतीची महत्त्वाची
जबाबदारी पेलावी लगणार आहे. त्यासाठी तुम्हाला पाठवले जाईल. तेथेही तुम्ही सैन्य धर्माचे पालन करा. ’’
प्रसन्न सकाळी जवानांनी केलेल्या शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. अखौरा ड्रील स्क्वेअर मैदानावर दक्षिण बाजूने सर्वांत प्रथम रिक्रूट परेड कमांडर जमिल जोसचे आगमन झाले. त्याने आवाहन करताच जवानांच्या चार तुकड्या ‘कदम ते कदम’ मिळवत मैदानात दाखल झाल्या. त्यांच्यापाठोपाठ बँड पथक आले. बँडपथकात बॅगपायपर वादकांंचाही समावेश होता. इन्फंट्री ट्रेनिंग बटालियनचे प्रमुख कर्नल संतोषकुमार जयस्वाल यांनी व नंतर एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप भाटी यांनी जवानांकडून सलामी स्वीकारली. नंतर प्रमुख पाहुणे मेजर जनरल बावा यांचे सलामी मंचावर आगमन झाले. उघड्या जीपमधून त्यांनी संचलनाचे निरीक्षण केले.
नंतर परेड अ‍ॅड्ज्युटंट मेजर विक्रम राजेभोसले यांनी संचलनाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर लगेच राष्ट्रीय ध्वज घेतलेल्या तुकडीचे मैदानात आगमन झाले. त्यावेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. सर्व उपस्थितांनी उभे राहून ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर हिंदू, शीख, मुस्लिम व ख्रिस्ती धर्मगुरूंचे आगमन झाले. धर्मग्रंथांवर हात ठेवून जवानांनी देशरक्षणाची शपथ घेतली.
शहीद भोलासिंगच्या कर्तृत्वाचे स्मरण - निवेदकाने सांगितलेल्या एका प्रसंगाने उपस्थित गहिवरले. शहीद नायक भोलासिंह याने आपल्या पत्नीला पत्रात लिहिले होते, ‘‘माझ्या युनिटला शिधा पोहोचवण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी पार पाडीनच. कर्तव्य बजावताना मला मरण आले, तर तू दुसरे लग्न कर. तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल.’’ दुर्दैवाने कर्तव्य बजावताना भोलासिंह शहीद झाला.