आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी आधुनिकीकरण; खासगी क्षेत्राने पुढे यावे - मेजर राजेश बावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भारतीय सैन्यात कोणत्याही लष्करी सामग्रीचे वय किमान 25 वर्षांचे असते. त्यामुळे नवीन शस्त्रनिर्मिती करताना जुनी शस्त्रे टाकून देता येत नाही. जवानांकडे सध्या असणा-या ‘इन्सास’ रायफलची जागा घेऊ शकणा-या नव्या आधुनिक रायफलवरील संशोधन अंतिम टप्प्यात आहे. फक्त ही रायफलच नव्हे, तर इतर साधनांच्या निर्मितीसाठी म्हणजेच लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी खासगी क्षेत्राने पुढे यावे, असे आवाहन मुंबई सब एरियाचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल राजेश बावा यांनी मंगळवारी येथे केले.
मॅकेनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये (एमआयआरसी) जवानांच्या दीक्षान्त संचलनासाठी मेजर जनरल बावा आले होते. शानदार संचलनानंतर त्यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. नंतर त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. ‘एमआयआरसी’कडे अनेक वर्षांपासून आयसीव्ही (रशियन नाव बीएमपी) हे हलके लढाऊ वाहन आहे. हे वाहन युद्धभूमीवर वेगवान हालचालींसाठी व मारक क्षमतेसाठी ओळखले जाते.
जगभरात लष्करी सामग्रीत कमालीचे अत्याधुनिकीकरण होत असताना एमआयआरसीकडे अद्याप आयसीव्हीची तीच पिढी आहे. तिच्या अत्याधुनिकीकरणाचा प्रयत्न होत नाही का, यावर ते म्हणाले, ‘आपण इतर देशांकडून फक्त शस्त्रे विकत घेत नाही, तर ती आपल्याकडेच बनवतो. त्यादृष्टीने आता आयसीव्ही 1 व आयसीव्ही 2 भारतीय बनावटीचे आहेत. एखादे नवीन शस्त्र बनवायचे असेल, तर त्याचा खर्च खूप जास्त असतो. त्यामुळे आम्ही भविष्यातील आयसीव्ही ज्याला म्हणतो, ते फ्युचर आयसीव्ही बनवून देण्यासाठी आता खासगी उद्योगक्षेत्राला आवाहन करीत आहोत. पाश्चात्य राष्ट्रांत लष्करी सामग्रीच्या निर्मितीत खासगी क्षेत्राचे योगदान मोठे असते. आपल्याकडेही तसेच घडायला हवे.’
‘एमआयआरसी ही देशातील महत्त्वाची रेजिमेंट आहे. कारण येथे जवानांना अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी अत्याधुनिक साधनांचा उपयोग केला जातो. यापुढे कमीतकमी मनुष्यबळ व अत्याधुनिक साधनसामग्री असेच सूत्र असेल. त्यात मारक क्षमतेवर अधिक भर असेल.’’ असे ते म्हणाले.
युद्धात फक्त साधने आधुनिक असून चालत नाही, तर ती उत्कृष्ट पद्धतीने चालवण्याची क्षमता असलेली माणसे (मॅन बिहाइंड मशीन) असणे गरजेचे असते. एमआयआरसीत असेच जवान घडवण्याचे काम चालते, असे बावा यांनी सांगितले.
जवानांकडे सामान्यांचे दुर्लक्ष - चाळीस वर्षांची सेवा झालेले मेजर जनरल बावा दीक्षान्त संचलनाने प्रभावित झाले. लष्करी सेवा सामान्य नोकरीपेक्षा वेगळी असते, असे नमूद करून ते म्हणाले, ‘लष्करात येणारी माणसे मुळातच खूप वेगळी असतात. त्यांना खडतर परिस्थितीत नोकरी करावी लागते. अनेकदा सुटी मंजूर होत नाही. कुटुंबापासून दूर राहून तो सर्वोच्च् असे कर्तव्य बजावत असतो. तरीही समाजात त्याला किंमत मिळत नाही. तो सुटीवर गावी गेला, तर बसमध्ये साधी जागा त्याला कोणी देत नाही. त्याच्या कामाची कोणी कदर करीत नाही. समाजाने जवानांना मदत करायला हवी. तसे झाले तर त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.’