आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंगोत्सवात रंगले अवघे नगरकर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -‘ओ...काट..’, ‘ढिल दे दे दे रे भय्या...’चा पतंगोत्सवातील पारंपरिक वाक्यांचा कानावर येणारा आवाज एकीकडे आणि काटला रे... अशी अस्सल नगरी हाक, एकूणच काय तर एकीकडे आकाशात पतंगांचा माहोल आणि दुसरीकडे घराच्या गच्चीवर, मोकळ्या मैदानावर साउंड सिस्टीमच्या साथीने आणि तिळगुळासह मेजवानीचा आस्वाद घेत पतंग उडवणारे असेच काहीसे चित्र शनिवारी शहरभर होते. नगर शहर अाणि परिसरात पारंपरिक पध्दतीने मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. 

सण असो वा उत्सव, नगरमध्ये तो दणक्यात साजरा होणार हे ठरलेले आहे. त्यामुळे शनिवारी मकरसंक्रांतीच्या पर्वावर शहरातील सर्व गल्लीबोळात पतंगोत्सवाचा माहोल होता. सकाळी हलक्याने पतंग उडवण्यास सुरुवात झाली, नंतर पतंगोत्सवाचा माहोल अधिक गडद होत गेला. साउंड सिस्टिमच्या तालावर तरुण तरुणी पतंग उडवण्यात दंग झाले होते. 

शहरातील केडगाव, सावेडी, भिंगार, पाइपलाइन रोड, नागापूर, प्रोफेसर कॉलनी, पारिजात चौक या भागात दिवसभर पंतगोत्सव साजरा करण्यात आला. चीनी मांजामुळे अपघात होतात. त्यात अनेक जण आतपर्यंत जखमी झाले आहे. या चिनी मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. चिनी मांजावर विक्रीवर बंदी असतानाही शहरातील अनेक भागात सर्रासपणे चिनी मांज्यांची विक्री झाली. महापालिका प्रशासनाने गेल्या तीन दिवसांत किरकोळ स्वरुपाची कारवाई करुन चिनी मांजा ताब्यात घेतला असला, तरी ज्या प्रमाणात कारवाईची अपेक्षा होती, ती झाली नाही. शहरात गेल्या पाच दिवसांत सुमारे १० ते १५ लाखांच्या चिनी मांजाची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज अाहे. शहरात चोरट्या मार्गाने चिनी मांजांची विक्री झाली. संक्रांतीच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात हा चिनी मांजा विकला गेला. दरम्यान, शुक्रवारी शहरात घरोघरी भोगी साजरी करण्यात आली. भोगीच्या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करुन भाजी करुन त्याचा आस्वाद घेण्यात आला. 
 
शुक्रवारी मकर संक्रांतीनिमित्त शहर परिसरात वाण खरेदी करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. मकर संक्रांतीनिमित्त घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यात आला होता. त्याचबरोबर संक्रातीनिमित्त महिलांनी मंदिरांमध्ये जाऊन पूजाअर्चा केली. त्याचबरोबर महिलांनी एकमेकींना वाण देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यंदा वाणासाठी स्टीलचे चमचे, प्लास्टिकच्या वस्तूंना मोठी मागणी होती. स्टीलपेक्षा यंदा वाणासाठी देण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंना सर्वाधिक मागणी होती. मोठ्या दुकानांमध्ये २० रुपयांपासून ते ७० रुपये डझनपर्यंतच्या किंमतीच्या वस्तू विक्रीसाठी होत्या. त्याचबरोबर रस्त्यावरही वाणाच्या साहित्याचे दुकाने थाटण्यात आली होती. मकर संक्रांतीनिमित्त शहरात एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तयार असलेल्या तिळांच्या लाडू पाकिटांना यंदा चांगली मागणी होती. 

जल्लोष अन‌् नाराजीही 
आपला पतंग उडवण्यापेक्षा काटलेला पतंग पकडून तो उडवण्याचा आनंद वेगळाच असतो आणि तोच आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. काटलेला पतंग पकडला की पकडणाऱ्यांमध्ये जल्लोष आणि ज्याचा पतंग कटला तो मात्र नाराज असे हे चित्र शहरभर होते. कापलेला पतंग पकडण्यासाठी इकडून तिकडे धावाधाव आणि छोटीमोठी भांडणेही काही ठिकाणी दिसून आली. दिवस जसजसा वर चढत गेला तसतसा पतंगांचा माहोल आणखीच चढलेला दिसून आला. 
बातम्या आणखी आहेत...