नगर- डॉ. केशव हेगडेवार यांनी १९२५ मध्ये सुरू केलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम अव्याहत चालू आहे. हिंदू समाजाचे रक्षण करून त्यांना शक्तिशाली करण्यासाठी संघ काम करत आहे. चांगला भारत निर्माण करण्याचे संघाचे कर्तव्य आहे. जातिभेद, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच अशी विषमता देशात पसरल्याने त्याचा फायदा इतर देश उचलतात. त्यासाठी भारताला सर्वसमावेशक हिंदूराष्ट्र बनवणे, हेच संघाचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन संघाचे पश्चिम क्षेत्र संपर्कप्रमुख सुरेश जैन यांनी केले.
पेमराज सारडा महाविद्यालयात गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या संघाच्या प्रथमवर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. सराला बेट मठाचे महंत रामगिरी महाराज, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संचालक नाना जाधव, वर्गाधिकारी अरविंद साठे, शहर संघसंचालक शांतीलाल चंदे आदी यावेळी उपस्थित होते. जैन म्हणाले, संघाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता हा संघकार्य सांभाळून आपापल्या क्षेत्रात अद्वितीय कार्य करत आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता श्रेष्ठ आहे. देशाला परमवैभव प्राप्त करून देण्याची संघाची अभिलाषा आहे. संघाने जे काम हाती घेतले, ते तडीस नेले आहे. रामजन्मभूमी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.
असंभव असलेले कार्य स्वयंसेवकांनी काही तासांत करून दाखवले. मात्र, राममंदिराचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. कोट्यवधी हिंदूंनी ठरवले, तर आजच राममंदिराचे काम पूर्णत्वास जाऊ शकते. भारताविरुद्ध आज सर्वच स्तरातून षडयंत्र हाेत आहे. या षडयंत्रांना भक्कम सावधपणे तोंड द्यावयाचे आहे. यासाठी संघाच्या दैनंदिन शाखेमधून स्वयंसेवक निर्माण करून व्यक्तीला व्यक्ती जोडण्याचे काम संघाकडून सुरू आहे, असे जैन यांनी सांगितले.
रामगिरी महाराज म्हणाले, जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून भारतीय संस्कृती ओळखली जाते. पूर्वजांनी वैभवशाली अनमोल ठेवा आपल्यासाठी संस्कृतीच्या रुपाने दिला आहे. या संस्कृतीचे रक्षण करणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. त्यासाठी सुप्त स्वाभिमान जागृत होणे आवश्यक आहे. सनातन संस्कृती नष्ट करण्याचे कारस्थान होत असताना त्याचा प्रतिकार करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. संघाकडून राष्ट्रनिर्मितीचे अत्यंत स्तुत्य काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
संघशिक्षा वर्गाच्या समारोपासाठी आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहण, संघाची प्रार्थना, शिबिरार्थी स्वंयसेवकांची ध्वजप्रदक्षिणा झाली. त्यानंतर शिबिरार्थींनी विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखवली. यात नियुद्ध, योगचाप (लेझीम), दंडयुद्ध प्रात्यक्षिक, सांघिक सूर्यनमस्कार, दिंडी रिंगण आदी प्रात्यक्षिकांचा यात समावेश होता.
वर्गकार्यवाही रविकांत कळंबकर यांनी गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या वर्गाची माहिती दिली. आभार शहर कार्यवाह वाल्मीक कुलकर्णी यांनी मानले. नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयात सुरू असलेल्या संघाच्या शििबराचा समारोप शनिवारी झाला. या वेळी शिबिरार्थींनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. समारोपप्रसंगी सुरेश जैन यांनी मार्गदर्शन केले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, शारीरिक बौद्धिक प्रशिक्षण...