आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्वदाव्या वर्षीही मदतीचा हात...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नव्वदी उलटली, तरी श्रीगोंद्याच्या स्नेहप्रभा मेहता यांचा सामािजक व राष्ट्रीय कार्यातील उत्साह कमी झालेला नाही. पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनाग्रस्तांना श्रीगोंद्यातून पहिल्यांदा मदत जर कोणी पाठवली असेल, तर स्नेहप्रभा यांनी.

श्रीगोंद्यातील रविवार पेठेत एकट्या राहणाऱ्या स्नेहप्रभा या दिवंगत स्वातंत्र्यसैनिक रमणलाल रामचंद मेहता चिंभळेकर यांच्या पत्नी. आपला वाढदिवस साजरा न करता विविध सामाजिक संस्थांना ते दरवर्षी मदत देत. तीच प्रथा पतीच्या निधनानंतर स्नेहप्रभा यांनी सुरू ठेवली आहे. गोकुळाष्टमीला त्यांचा नव्वदावा वाढदिवस झाला. याही वे‌ळी त्यांनी सढळ हस्ते मदत केली.

काही दिवसांपूर्वी माळीण येथे झालेल्या दुर्घटनेने स्नेहप्रभा हेलावल्या. त्यांनी तेथील संकटग्रस्तांसाठी तीन हजार रूपयांची मदत देऊ केली. समाजातील इतरांनीही इतर खर्च टाळून अशा लोकांना मदत केली पाहिजे, असे त्या म्हणतात.
स्नेहप्रभा यांनी चार-पाच मुलांना शिक्षणासाठी मोठा आधार दिला. सावित्रीबाई फुले योजनेत तीन मुली दत्तक घेऊन दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. महादजी शिंदे विद्यालय व होनराव यांच्या कन्या शाळेला त्यांनी मदत केली आहे. मंदिरांबरोबर दुष्काळग्रस्तांसाठीही त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

स्नेहप्रभा यांचे वय झाले असले, तरी प्रत्येक १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला त्या ध्वजवंदनासाठी आवर्जुन जातात. एकही वर्ष त्यांनी हा राष्ट्रीय कार्यक्रम चुकू दिलेला नाही. यंदा त्यांना श्रीगोंद्यातील होनराव विद्यालयात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवण्यात आले होते.

स्नेहप्रभा यांची विवाहित कन्या अलका मेहता-सांखला सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. आपल्या आईचा सामाजिक कार्याचा वसा त्यांनी तेथेही चालू ठेवला आहे. अमेरिकेतील विविध संस्थांमध्ये त्या सध्या योग व जैन परंपरेविषयी व्याख्याने देत आहेत.