आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रिअँलिटी शो’मुळे मल्लखांबाला प्रसिद्धी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मल्लखांब खेळल्यामुळे खेळाडूंची ताकद व आत्मविश्वास वाढतो. शरीर तंदुरुस्त राहण्याकरिता मल्लखांब खेळणे गरजेचे आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात या खेळाचा प्रसार चांगला झाला आहे. आपण ‘रिअँलिटी शो’ला नावे ठेवत असलो, तरी अशा शोमुळेच मल्लखांबाला अधिक प्रसिद्धी मिळाली, असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्लखांबपटू रवींद्र पेठे यांनी रविवारी महर्षी ग. ज. चितांबर शाळेमध्ये केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि नव विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटन पेठे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले होते. या वेळी नवविद्या प्रसारक मंडळाचे सचिव अँड. सतीश भोपे, सहसचिव उषा देशमुख, खजिनदार वसुमती गिते, क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने उपस्थित होते.

शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेले नगरचे रामदास ढमाले (जलतरण), विलास दवणे (पॉवर लिफ्टिंग व अँथलेटिक्स) व अंजली देवकर (ज्युदो) हे खेळाडू या वेळी उपस्थित होते. या तिघांचा पेठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवविद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक ग. ज. चितांबर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महर्षी ग. ज. चितांबर शाळेत ही मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही दोनदिवसीय स्पर्धा 16, 17 व 19 वर्षे वयोगटात होत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा, सोलापूर शहर व जिल्हा, नगर शहर व जिल्ह्यातील एकूण 196 खेळाडू या स्पध्रेत सहभागी झाले आहेत. मुलींसाठी दोरीवरील, तर मुलांसाठी जमिनीमध्ये रोवलेल्या मल्लखांबावर ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंच्या निवासाची सोय सुयोग मंगल कार्यालयात करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता एकूण 15 पंच नेमण्यात आले आहेत.

डिसेंबरमध्ये सातारा येथे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी पुणे विभागाचा मुलींचा संघ या स्पर्धेतून निवडला जाणार आहे. या स्पर्धेच्या यशस्विततेसाठी मंडळाच्या उपाध्यक्ष नलिनी भालेराव, खजिनदार वसुमती गिते, क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने, मुख्याध्यापिका रंजना जोशी, सरोज बंगाळे, श्रीकांत चितांबर, विजय देवचके, चंद्रशेखर धर्माधिकारी, विनायक कोटस्थाने पर्शिम घेत आहेत. स्पर्धा पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने तरुण-तरुणी गर्दी करीत आहेत.