आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात लाखांचा ‘ड्रॉप’; स्वस्तात सोन्याच्या बहाण्याने नेवासे तालुक्यात लूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्वस्तात कळशीभर सोने देतो, असा बहाणा करून ठाण्यातील एका व्यक्तीला सात लाखांना गंडा घालण्यात आला. ही घटना नेवासे तालुक्यातील नजीक चिंचोली शिवारात गुरुवारी दुपारी घडली. मध्यस्थ असलेल्या सूरज विभिषण गुप्ता (ठाणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठाणे येथील मनोज रामभाऊ कदम यांनी फिर्यादीत म्हटले की, मनोज हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो. ठाणे येथीलच आयुर्वेद औषधी विक्री करणार्‍या सूरज गुप्ता याच्याशी त्याची मैत्री झाली. गुप्ता याने कदम याला सांगितले की, नेवासे येथे अजित कुणबी नावाचा नाडी पाहणारा एक ज्योतिषी आहे. या ज्योतिषाच्या एका रुग्णाला नजीक चिंचोली शिवारात साडेतीन किलो सोने सापडले असून तो हे सोने विकण्यासाठी ग्राहक पाहत आहे. 1 सप्टेंबर रोजी अजित कुणबीबरोबर मनोज कदम व सूरज गुप्ता हे नजीक चिंचोली येथे आले. नजीक चिंचोलीतील तथाकथित ज्योतिषाच्या मुलाने एका शेतात त्यांना नेऊन कळशीत ठेवलेल्या सोन्याच्या अंगठय़ा दाखवल्या व सोने खरेदीसाठी दहा लाख रुपये आणण्यास सांगितले.

त्यानुसार गुरुवारी मनोज व त्याचा भाऊ अविनाश, गुप्ता, संदीप गावळे हे चौघेजण इंडिका कारने शेतात गेले. गाडी थांबवताच आठजणांनी बंदुकीचा धाक दाखवत जबर मारहाण करून कदम यांच्या हातातील सात लाख रुपये असलेली पिशवी घेऊन पोबारा केला. याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदेश चकोर करीत आहे.