आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Died After Fall Down In Well For Water At Belpandhari Dist Ahmednagar

नगर जिल्ह्यात पाण्यासाठी शेतमजुराचा पहिला बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - नेवासे तालुक्यातील बेलपांढरी शिवारातील गोदावरीच्या वाळूपात्रात पाण्यासाठी झिरा (बुडकी विहीर) खोदणाऱ्या मजुराचा वाळू ढसळल्याने दबून दुर्दैवी मृत्यू झाला. नेवासे तालुक्यासह हा जिल्ह्यातील दुष्काळाचा पहिला बळी ठरला. देवराव दशरथ राजळे असे मृत शेतमजुराचे नाव आहे.

नेवासे तालुक्यामध्ये सुरेगाव येथील देवराव दशरथ राजळे व इतर तिघे बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून बेलपांढरी शिवारात गोदावरी नदीपात्रातील वाळूत रिंगा टाकून झिरा खोदण्याचे काम करत होते. सुमारे १५ ते १६ फूट खोदलेल्या या झिऱ्यामध्ये चार रिंगा टाकलेल्या होत्या. त्यामुळे त्याला बरोबर गोल आकार आलेला होता. सर्वात खाली असलेल्या पाण्यातून वाळू काढीत असताना अचानक या रिंगामधून वाळू निसटण्यास सुरुवात झाली.आणि सर्वात खाली असलेला देवराव राजळे हा वाळूमध्ये गाडला गेला. त्याचा जोडीदार वाळूत आर्धा गाडला गेला. त्याला इतर दोघांनी वर काढले. परंतु देवराव राजळे हा वाळूत ढिगाऱ्याखाली गुदमरून मृत झाला. याबाबत नेवासे पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर राजळे यांनी दुपारी माहिती दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल आर. एस. पवार करीत आहेत.
दरम्यान, गावातील दोन जेसीबीच्या साहाय्याने सुमारे दोन तास खड्डा खाेदल्यानंतर राजळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहावर नेवासे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री ७ वाजता सुरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत देवराव दशरथ राजळे यांच्या मागे पत्नी व ४ मुली आहेत. त्यापैकी एका मुलीचा विवाह झालेला आहे.
राजळे कुटुंबाला शासनाने मदत करावी
- देवराव राजळे हे घरातील एकमेव कर्ते पुरुष होते. ते मृत झाल्याने त्यांचा परिवार उघड्यावर पडला अाहे. त्यांना दुष्काळग्रस्त शेतकरी म्हणून शासनाने त्यांच्या कुटुंबीयास मदत करणे गरजेचे आहे.
- अण्णासाहेब पटारे, सदस्य, तालुका खरेदी-विक्री संघ.