आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्रवृक्ष नामशेष झाले, आता स्मृतिस्तंभाकडेही दुर्लक्ष...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अमृतवाहिनी प्रवरेकाठी जिथे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली, तेथील पैस स्तंभ अवघ्या मराठीजनांचे र्शद्धास्थान आहे. पैस असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आणखी एक दगडी स्तंभ आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी या परिसरात आंब्याची झाडे लावण्यात आल्याचा उल्लेख त्यावर आहे. आता ते आम्रवृक्ष राहिलेले नाहीत. काळाच्या कराल दाढांतून वाचत तो स्तंभ अजून तग धरून उभा असला, तरी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

नेवासे गावातून ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर हा स्तंभ आहे. रस्तारुंदीत सापडून आता तो डांबरीकरणात अडकला आहे. या स्तंभावर दर्शनी बाजूला शिलालेख आहे. वरील बाजूस इंग्रजीत, तर खाली मराठीत मजकूर आहे. डांबरीकरण करताना हा स्तंभ बुजवला गेला असून आता त्याचा वरचा पाऊण भागच उरला आहे. मजकुरावर डांबर उडाले असल्याने तो नीट वाचता येत नाही.

या शिलालेखातील अक्षरे अतिशय सुबक आहेत. ‘‘गुलाबचंद बिरजमल अलाइज बापुशेठ हॅज प्लांटेड मँगो ट्रीज ऑन द बोथ साइड ऑफ द रोड’’ असे नमूद करून खालील बाजूस ‘कलेक्टर’ असे लिहिण्यात आले आहे. हा शिलालेख सन 1909 मधील आहे. म्हणजे सुमारे शंभर वर्षांपूर्वी तेथे आंब्याची झाडे लावण्यात आली असावीत. आता मात्र या रस्त्यावर ते आम्रवृक्ष नाहीत.

ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता रुंद करताना या स्तंभाकडे कोणी लक्ष दिले नाही. या स्तंभाखाली असलेला ओटा रस्त्यात गेला आहे. एखाद्या वाहनाची धडक बसून उरलेला खांबही होत्याचा नव्हता होईल. काम सुरू करण्यापूर्वीच हा स्तंभ व्यवस्थित स्थलांतरीत करणे शक्य होते, पण त्याबाबत कोणी विचार केला नाही. कोट्यवधी रूपये या रस्त्यावर खर्च करताना या खांबाच्या जतन व सुशोभीकरणासाठी थोडे पैसे देता आले असते, पण ते होऊ शकले नाही..

वृक्षारोपणाचा संदेश देणारा एकमेव स्तंभ

ब्रिटिशकाळातील काही कलेक्टर निसर्गप्रेमी होते. महाराष्ट्राच्या विविध भागातील थंड हवेची ठिकाणे विकसित करताना त्यांनी वृक्षारोपण करण्यासाठीही प्रोत्साहन दिले. नगरजवळील डोंगरगण, अकोले तालुक्यातील घाटघर, जामखेडजवळील रामेश्वर ही त्यांची आवडती ठिकाणे होती. एखाद्या व्यक्तीने झाडे लावल्याबद्दल शिलालेख लावण्याचे नेवासे येथील एकमेव उदाहरण असावे.