आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मनसेने जनतेचा अपेक्षाभंग केला. भाषणे करून गर्दी जमवता येते; विकास नाही\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकांना जी अपेक्षा होती ती ते पूर्ण करू शकले नाही. मनसेने नवनिर्माण न केल्याने लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्‍यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. ते म्‍हणाले, मनसेला नाशिकमध्ये सत्ता मिळूनदेखील तेथे नवनिर्माण करता आले नाही, भाषणे करून गर्दी जमवता येते; मात्र विकास करता येत नाही. कॉँग्रेस पक्षाचा विकासावर विश्वास असल्याने देशातील जनता कॉँग्रेस पक्षाबरोबर राहिली आहे.

रामदास आठवले असोत किंवा राष्ट्रवादी दोघेही आमच्यापासून यापूर्वी दूर गेले होते. तरीही कॉँग्रेसला काहीही फरक पडला नाही. उलट कॉँग्रेस जोमाने वाढतेय. आठवले सध्या महायुतीच्या स्वप्नात गुंतलेले असल्याने त्यांचे हेडक्वॉर्टर नागपूर झाले आहे. तिथे त्यांची जी कुचंबणा सुरू आहे, ती पाहता स्वगृही परतल्यास त्यांचे स्वागतच आहे, अशी भूमिकाही ठाकरे यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.

उत्तर महाराष्ट्र कॉँग्रेस पक्षाच्या ब्लॉक अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांच्या बैठकीसाठी माणिकराव ठाकरे शिर्डी येथे आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉँग्रेस 1999 मध्ये कॉँग्रेसमधून फुटून तयार झाली, असे असतानाही त्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षानेच सर्वाधिक जागा जिंकल्या. काही अपवाद वगळता कॉँग्रेस आजही पुढेच आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्ष समविचारी पक्षांना बरोबर घेऊनच निवडणुकीत उतरणार आहे. रामदास आठवले सध्या ज्या युतीत आहेत, तेथे त्यांची होत असलेली घालमेल संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. महायुतीचे नियंत्रण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयामधून होत असल्याने आठवलेंची अवस्था बिकट झाली आहे. कॉँग्रेस नेहमीच शाहू, फुले, आंबेडकर विचारांशी एकरूप राहिलेली असल्याने भविष्यात रामदास आठवले परत स्वगृही आल्यास कॉँग्रेस पक्ष त्यांचे स्वागतच करेल, असेही माणिकरावांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या डागाळलेल्या प्रतिमेमुळे आगामी निवडणुकीत कॉँग्रेसवर परिणाम होईल का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, त्यांची अवस्था काय आहे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक असल्याने आपण त्यावर काहीही भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील हा विषय आहे. आपण अनेक वर्षे संघटनात्मक काम करीत असल्याने आपण सध्या आहे तिथेच काम करीत राहू, पक्षातील बदल हे पक्ष प्रमुखांच्या निर्णयानुसार होत असतात.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पक्ष नेतृत्व भविष्यात निश्चितच विचार करेल, असे सांगतांनाच गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींचा फेकू अजेंडा भारतीय जनता कधीही मान्य करणार नसल्याचे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.