आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात मांजरसुंभा गडाचे भाग्य उजळणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - निसर्गरम्य डोंगरगण आणि गोरक्षनाथगडाच्या मध्यभागी असलेला मांजरसुंभा गड नव्या वर्षात कात टाकणार आहे. ग्रामस्थ आणि नगर येथील जिवाशी ट्रेकर्स ग्रूपच्या वतीने या स्थळाचा पर्यटन विकास करण्यात येणार आहे. येत्या रविवारी (5 जानेवारी) जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या उपस्थितीत र्शमदानातून गडाच्या स्वच्छतेला प्रारंभ करण्यात येईल.
निर्मलग्राम, तंटामुक्त गाव, आदर्श गाव अशा अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले मांजरसुंभा आता जिल्ह्यातील पहिले ‘टुरिस्ट व्हीलेज’ बनेल. याबाबत सांगताना सरपंच जालिंदर कदम व जिवाशी ग्रूपचे डॉ. उमेश निंबाळकर म्हणाले, पर्यटकांसाठी विविध सोयी गडावर करण्याचा मानस आहे. पहिल्या टप्प्यात गडावरील ऐतिहासिक महाल, कारंजी व हमामखान्याची स्वच्छता र्शमदानातून करण्यात येईल. या उपक्रमात जिवाशी ट्रेकर्सचे युवक, तसेच प्रा. अनिल आठरे व प्रा. संजय कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू आर्टस् महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएसचे छात्र व ग्रामस्थ सहभागी होतील. गडावर असलेल्या तलावाचे पुनरूज्जीवन करून तेथे पाणी साठवता येईल का, हे अजमावण्यात येईल. सौरपथदिवे व फुलझाडे लावून परिसर सुशोभीत करण्यात येईल. कमिन्स इंडियाचेही मोलाचे सहकार्य या उपक्रमासाठी लाभत आहे.
नगर शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर वांबोरी रस्त्यावर गर्भगिरी रांगते असलेल्या या स्थळाची माहिती पर्यटकांना व्हावी, यासाठी नगर-औरंगाबाद रस्त्यावर, तसेच गोरक्षनाथ गडाकडे जाणार्‍या फाट्यावर माहिती फलक लावण्यात येणार आहेत. गडावर जाणार्‍या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे, असे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले.
पर्याटनासाठी शुभेच्‍छा
पिंपळगाव तलाव, त्याशेजारी असलेले मेहेराझाद, तारांगण, डोंगरगण, वाघदरा, मांजरसुंभा व गोरक्षनाथगड ही सर्व ठिकाणे एका दिवसात पाहणे शक्य आहे. तशी बससेवा सुरू होणे आवश्यक आहे. या संदर्भात चित्रकार योगेश हराळे यांनी जिल्हाधिकारी, तसेच नवे महापौर, उपमहापौर व आयुक्तांना नववर्ष दिनी चित्रमय ‘पर्यटन शुभेच्छा’ दिल्या.