आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manmad To Daud Shatal Train Service Start For Kumbhamela

कुंभमेळ्या निमित्त मनमाड ते दौंड शटल रेल्वे सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नाशिक येथे लवकरच सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त मनमाड ते दौंड शटल रेल्वे सेवा, तसेच शिर्डी नगर रेल्वेस्थानकावर भाविकांसाठी बूथ उभारण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जॉन थॉमस यांनी दिली.

सोलापूर येथे तिमाही रेल्वे सल्लागार समितीच्या विभागीय बैठक व्यवस्थापक थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला विभागातील अधिकारी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंग वधवा यांनी विविध प्रश्न मांडून ते सोडवण्याची मागणी केली.

नगर येथील रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, मुबलक शुध्द पाण्याची सुविधा करणे, जम्बो गुडशेड उभारणे, कार्यरत शेडची दुरुस्ती नूतनीकरण करणे, रेल्वेस्थानकावर स्वयंचलित तिकीट मशीन बसवणे कुंभमेळ्यानिमित्त शिर्डी शनिशिंगणापूर येथे भाविकांच्या वाढत्या गर्दीचे नियोजन करणे अशा विविध मागण्यांबाबत वधवा यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांना रमेश कोठारी रेल्वे सल्लागार समितीच्या अन्य सदस्यांनी चांगली साथ दिली.

मागण्यांबाबत व्यवस्थापक थॉमस म्हणाले, कुर्डूवाडी स्टेशन येथे सीसीटीव्ही आणि सिव्हेज प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर, नगर रेल्वेस्थानकावरही येत्या वर्षभरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येईल. त्यासोबतच स्वच्छ पाण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. जम्बो गुडशेडची दुरुस्ती करून खराब पत्रे बदलण्यात येतील. फ्लोरिंग संदर्भातही पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. कुंभमेळ्या निमित्त मनमाड ते दौंड शटल रेल्वे भाविकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात येणार असून नगर शिर्डी रेल्वेस्थानकावर भाविकांसाठी बूथ उभारण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

कुर्डूवाडी रेल्वेस्थानकावर सोलर यंत्रणा बसवण्याचे काम सुरू असून पुढील टप्प्यात नगर रेल्वेस्थानकावर सोलरचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती थॉमस यांनी दिली. येत्या दोन ते तीन महिन्यांत नगर रेल्वेस्थानकावर स्वयंचलित तिकीट मशीन कार्यान्वित करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नगर ते मनमाड या दोन स्थानकादरम्यान रेल्वेतील अनधिकृत विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी गेल्या दोन महिन्यांत २१० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. रेल्वे पोलिसांची संख्या वाढल्याने अजून कडक कारवाई करून प्रवाशांना अधिक सुरक्षितता प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिस फोर्सचे सोलापूर विभागीय प्रमुख विकास ढाकणे यांनी या बैठकीत दिली.

वर्षभरात मनमाड-दौंड मार्गाचे विद्युतीकरण
मनमाडते दौंड रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत मनमाड ते शिर्डीदरम्यान विजेवरील इंजिन धावेल. मार्च २०१६ पर्यंत मनमाड ते दौंड रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गावर विजेवरील रेल्वे धावतील या मार्गावरील बऱ्याचशा समस्या कमी हाेतील, असे जॉन थॉमस यांनी या बैठकीत स्पष्ट केले.