आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या आंदोलनाला हिंसक वळण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने मंगळवारी सकाळी स्टेट बँक चौकात करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. तारकपूर डेपोच्या बसवर (एमएच 20 डी 9141) दगडफेक करुन पेट्रोल टाकून ती पेटवण्यात आली. या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी 60 ते 65 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन 25 जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, या जाळपोळीशी संबंध नसल्याचा दावा सेवा संघाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

मराठा सेवा संघाच्या नेतृत्वाखाली नगर-औरंगाबाद राज्यमार्गावरील स्टेट बँक चौकात सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला 25 टक्के आरक्षण देण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होते. आरक्षणाच्या मागणीत खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलण्यासाठी आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करणारी पत्रके पूर्वीच वाटण्यात आली होती. जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन आंदोलनाची आगाऊ कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे या आंदोलनाच्या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. जमावबंदी आदेश लागू असून आंदोलन न करण्याबाबत पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी माघार घेतली नाही. प्रमुख वक्त्यांचे भाषण सुरु असताना बारा वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक चौकातून चांदणी चौकाकडे जाणा-या वळणावर अचानक धूर दिसला. बस पेटल्याचे लक्षात येताच सर्वांचीच धावपळ उडाली.

तारकपूर डेपोची ही बस माळीवाडा बसस्थानकातून आगडगावकडे निघाली होती. आंदोलनामुळे लागलेल्या वाहनांच्या रांगेत विक्रीकर भवनासमोर ही बस थांबली होती. मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी बसचालक संजय महादेव गुंजाळ, वाहक संभाजी जपकर व दोन-तीन प्रवाशांना दमदाटी करून खाली उतरवले. मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांसह सात ते आठ जणांनी सोबत छोट्या बाटल्यांमधून पेट्रोल आणले होते. बसच्या काचा फोडून पेट्रोलच्या बाटल्या सीटवर व बसवर फेकण्यात आल्या. दोघांनी आत जाऊन आग लावली. पेट्रोलमुळे बसने तत्काळ पेट घेतला. पाहतापाहता बसचा आतील भाग भस्मसात झाला.

आगीचे लोळ पाहून पोलिस व आंदोलकांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या 25 आरोपींना एमआयडीसी ठाण्याच्या कोठडीत पाठवण्यात आले. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

नुकसानभरपाई वसूल करणार
आंदोलकांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, आंदोलनस्थळापासून शंभर मीटरवर बस जाळण्यात आली. बसचे झालेले नुकसान आंदोलकांकडून वसूल करण्यात येईल. त्यासाठी आरोपपत्र लवकर पाठवण्याचे प्रयत्न करण्यात येतील.’’ - आर. डी. शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक

विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
सहायक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ पोपट गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 48 ज्ञात व इतर 15 ते 20 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कलम 143, 341, 454, 436, 427, 120(ब), 107, मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन, 135, 112, 117, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम 3 व 4 तसेच क्रिमिनल लॉ अ‍ॅमेंडमेंट अ‍ॅक्ट 1932 चे कलम 7 (1) अन्वये आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

प्रदेश संघटक डॉ. टकले यांचा आरोपींत समावेश
मराठा सेवा संघाचे प्रदेश संघटक डॉ. कृषिराज रुपचंद टकले (शिरसगाव, श्रीरामपूर), दक्षिण जिल्हाप्रमुख प्रशांत गोपाळ कल्हापुरे (अरणगाव), मराठा आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष किरण गुलाब काळे (भुतकरवाडी), प्रल्हाद गहुजीनाथ पाटील, मनोज साहेबराव थोरात, रामकिसन बाजीराव मडके, संजय मच्छिंद्र कर्डिले, अजय विलास जगताप, राजेंद्र कचरू सावंत, दत्ता रामभाऊ तोडमल, सोपान गोरख शेंडगे, गणेश अण्णा चौगुले, रवींद्र बन्सी खाकाळ, सागर गुलाबराव काळे, विलास मारुती कराळे, आरिफ शकिल अख्तर, सुशांत सुरेश झावरे, खंडेश्वर विजय कुलकर्णी, दादासाहेब प्रकाश ठोंबे, स्वरुप प्रल्हाद पाटील, गणेश नागदेव बोंबले, विनायक दादासाहेब लबडे, अमरजीत बाबासाहेब डेरे, अनिल पांडुरंग मखरे, शरद संभाजी ठोंबरे, अरुण जगताप, बंडू पाचपुते यांच्यासह 48 ज्ञात व 15 ते 20 अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

एसटीचे पाच लाखांचे नुकसान
पेट्रोल टाकून आग लावल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतील सीट पूर्णपणे भस्मसात झाल्या. छताचेही नुकसान झाले आहे. एकूण पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तारकपूर डेपोचे व्यवस्थापक प्रमोद नेहूल यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

बदनामीचा डाव
अ. भा. मराठा सेवा संघाचा बस जाळण्यात सहभाग नसल्याचे पत्रक प्रशांत कल्हापुरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. आमच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठीचा हा डाव आखण्यात आला आहे. हा प्रकार निंदनीय असून संघाच्या वतीने निषेध करत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.