नगर- "सदाशिव अमरापूरकर अमर रहे'च्या घोषात नगरच्या भूमिपुत्राला मंगळवारी दुपारी अखेरचा निरोप देण्यात आला.
आपल्या विविधांगी भूमिकांनी नाट्य व चित्रसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारे व रूपेरी विश्वात वावरतानाही सामाजिक भान जपणाऱ्या अमरापूरकरांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अवघे नगर लोटले होते.
अमरापूरकर यांचे सोमवारी (3 नोव्हेंबर) पहाटे मुंबईत उपचार सुरू असताना निधन झाले. मंगळवारी सकाळी नऊ वाजता त्यांचे पार्थिव माणिक चौकातील अमरापूरकर वाड्यात आणण्यात आले. सकाळपासूनच त्यांचे स्नेही, चाहते व सर्वसामान्य नगरकरांनी गर्दी केली होती. साडेनऊला अंत्यदर्शनाला सुरुवात झाली. खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी अनिल कवडे, अभिनेते अनिल क्षीरसागर, प्रकाश धोत्रे, सांस्कृतिक संचालनालयाचे सहसंचालक मनोज सानप, पुण्यातील "विद्यावाणी'चे संचालक आनंद देशमुख, आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम प्रमुख प्रदीप हलसगीकर यांच्यासह हजारो चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी अनेकांना हुंदका आवरला नाही. दुपारी पाऊणच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या वाहनात पार्थिव ठेवून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. कापडबाजार, चितळे रस्ता, दिल्ली दरवाजामार्गे अंत्ययात्रा अमरधाममध्ये आली. अंत्ययात्रेच्या मार्गावर दुतर्फा गर्दी झाली होती. मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, तसेच पुष्पहार अर्पण करून अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहणारे फ्लेक्सफलक लावण्यात आले होते. पावणेदोनच्या सुमारास अंत्ययात्रा अमरधाममध्ये आली. अंत्ययात्रा येण्यापूर्वीच अमरधाममध्ये हजारो नगरकरांनी गर्दी केली होती. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरापूरकर यांच्या पत्नी नंदाताई, तिन्ही कन्या व परिवारातील सगळे सदस्य यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, कवी व चित्रपट निर्माते-दिग्दर्शक रामदास फुटाणे, खासदार गांधी, आमदार जगताप, अभिनेते प्रकाश धोत्रे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अरुण कडू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मुळे, मकरंद खेर, प्रा. मंगेश जोशी, पी. डी. कुलकर्णी, मोहन सैद, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे डॉ. रवींद्र साताळकर, स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी, ग्राहक संघाचे शिरीष बापट, श्याम आसावा, उबेद शेख, सुशांत घोडके, शिल्पकार प्रमोद कांबळे, नाट्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश लोटके, नगर व्यासपीठचे सुधीर मेहता, प्रसाद बेडेकर, उमेश घेवरीकर, कवी प्रकाश घोडके, रुपाली देशमुख, संजय घुगे, प्रा. बाळकृष्ण गोटीपामूल आदी यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह हजारो चाहत्यांनी अश्रूभरल्या नेत्रांनी नगरच्या या भूमिपुत्राला अखेरचा निरोप दिला.
ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूकर यांचे पार्थिव मुंबईहून नगरला आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी माणिक चौकातील अमरापूरकर वाड्यात ठेवण्यात आले. त्यांच्या परिवाराने धार्मिक विधी केल्यानंतर अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेत हजारो नगरकर सहभागी झाले होेते. अमरधामजवळ अंत्ययात्रा आली, तेव्हा तिला जनसागराचे स्वरुप प्राप्त झाले. आतमध्ये पाऊल ठेवायला जागा उरली नाही. अनेकजण झाडांवर चढून बसले होते. नगर जिल्ह्या व्यतिरिक्त राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते व रंगकर्मी अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित होते.
नाट्यगृह बांधून श्रद्धांजली
अमरापूरकरांच्या हयातीत रंगकर्मींसाठी आम्हा लोकप्रतििनधींना नाट्यगृह उभारता आले नाही, याची लाज वाटते. केंद्रात व राज्यात आता भाजपचे सरकार, तसेच शहरातील आमदारही बदलल्याने वर्षभरात नाट्यगृह उभारण्यात येईल. या नाट्यगृहाला अमरापूरकर यांचे नाव देऊ.''
दिलीप गांधी, खासदार.
विकासाचा ध्यास घेतलेला अभिनेता
अमरापूरकर हे केवळ प्रथितयश अभिनेतेच नव्हते, तर शहराच्या विकासाचा ध्यास असलेले व्यक्तिमत्त्व होते. शहराच्या विकासाची गरज त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. विकास होत नसल्याची खंतही त्यांनी जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवली होती.''
संग्राम जगताप, आमदार.