आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actor Tingya, Sharad Goyekar At Ahmednagar

चांगली कथा असल्यास नाटकही करणार..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ‘टिंग्या’ चित्रपटाने कलावंत म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली, अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्यानंतर दुसरा चित्रपट केला नसला, तरी अभिनय हाच श्वास आहे. चांगले नाटक मिळाले, तर ते नक्की करणार, असे मनोगत टिंग्या ऊर्फ शरद गोयेकर याने व्यक्त केले.

नगरमधील ज्योतिष अभ्यासक अतुल खिस्ती यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शरद नगरला आला होता. त्यावेळी त्याने ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला भेट देऊन मनमोकळेपणे संवाद साधला. सध्या तो सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये दहावीच्या वर्गात शिकतो आहे. लहान वयात प्रचंड प्रसिद्धी मिळूनही जमिनीवरच असलेल्या शरदने ‘मला टिंग्या म्हणूनच हाक मारा,’ अशी सुरुवात करीत या भूमिकेवर तो किती प्रेम करतो, हे स्पष्ट केले. तो तीन वर्षांपासून खिस्ती यांच्याकडे येत आहे.

टिंग्या चित्रपटानंतर शरदने कोणताही चित्रपट केला नाही, पण ‘चिन्या’ नावाची मालिका केली. या मालिकेतही त्याची भूमिका महत्त्वाची होती. आता दहावीच्या अभ्यासामुळे अभिनय बाजूला ठेवल्याचे त्याने स्पष्ट केले. सध्या प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्याबरोबर एक चित्रपट करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्याने दिली. चित्रपटाबरोबरच नाटकातही काम करण्याची इच्छा आहे, मात्र तशी भूमिका मिळाली पाहिजे, असे तो म्हणाला.

अभिनयाव्यतिरिक्त काय करण्याची इच्छा आहे, असे विचारले असता त्याने व्यावसायिक होणार असल्याचे स्पष्ट केले. कोणतीही नोकरी करणार नाही, असे त्याने ठासून सांगितले. त्यासाठी शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

टिंग्याला मिळालेले विविध पुरस्कार
>उत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रपती पुरस्कार
>(श्यामची आई - माधव वझे, श्वास - अश्विन चितळेनंतर शरद गोयेकर)
>राज्य सरकारचा उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार
>आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पेशल ज्युरी अँवार्ड
>झी मराठीचा उत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार
>ऑस्करसाठी नामांकन