आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाच्या सहवासात केशरबागेमध्ये धोंड्याच्या जेवणावळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अधिकमहिना म्हणजे धोंड्याचा सण. मुलगी जावयाला आग्रहाने बोलावून त्यांच्यासाठी धोंड्याचे जेवण केले जाते. पारंपरिक पद्धतीने घरी हा कार्यक्रम करण्याऐवजी काही हौशी मंडळी सध्या निसर्गाच्या सहवासात धोंडा साजरा करत आहेत.

नगर शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर नगर-दौंड रस्त्यावर खंडाळा परिसरात पर्यावरण योगप्रेमी अनिल मेहेर यांनी "केशरबाग' नावाचे निसर्गरम्य पर्यटन केंद्र विकसीत केले आहे. खडकाळ माळरान विकत घेऊन तिथे प्रयत्नपूर्वक झाडे वाढवण्यात आली आहेत. आंबा, पेरू, मोसंबी, सागवान अशी अनेक प्रकारची झाडे सध्या तिथं आनंदाने डोलत आहेत. पाण्याची सोय झाल्याने विविध प्रकारचे पशू-पक्षीही केशरबागेला भेट देऊ लागले आहेत. तिथल्या झाडांची फळे खास पक्ष्यांसाठी राखून ठेवली जातात.

बैलगाडीतून भ्रमंती, हिवाळा असेल तर हुरडा, उसाचा रस, त्याच्याबरोबर शुद्ध शाकाहारी जेवण, त्यात गरम गरम भाकरी, पिठलं, थालपीठ असा मेनू असल्याने केशरबागेत आख्खा दिवसही आनंदात व्यतित होतो. मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळ तिथे आहेत. नौकानयनासाठी तलाव तयार करण्यात येत असून लवकरच ही सुविधा उपलब्ध होईल.

अनेक मंडळी आपले कौटुंबीक कार्यक्रम किंवा मित्र परिवाराची संमेलने केशरबागेत साजरी करतात. सध्या धोंड्याचा महिना सुरू असल्याने निसर्गप्रेमी मंडळी मुलगी जावयासाठी केशरबागेतच कार्यक्रम आयोजित करत आहेत. त्यांच्यासाठी खास पुरणाचे धोंडे तयार करण्याची व्यवस्था मेहेर परिवाराने केली आहे.

काहीजणांकडे वाहनाची सोय नसते. अशांसाठी मेहेर यांनी नगरमधून येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र १४ आसनी गाडीची व्यवस्था केली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने वर्षा सहलीचा आनंदही केशरबागेत घेता येऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...