आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Film News In Marathi, Actore Milind Shinde

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘माणूस’ असण्याचा सिनेमा बनवा - मिलिंद शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - समाजातील माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक कलाकाराने पणतीप्रमाणे तेवत राहावे, आपापला खारीचा वाटा उचलावा. कारण पोषक वातावरणनिर्मिती करण्याची जबाबदारी कलाकाराचीच असते. सवंग सिनेमे कोणीही बनवतो. ‘माणूस’ असण्याचा सिनेमा बनवा, असे आवाहन अभिनेते मिलिंद शिंदे यांनी रविवारी केले.


न्यू आर्ट्स कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातर्फे सहकार सभागृहात आयोजित ‘प्रतिबिंब राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’चे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे होते.


भारतीय चित्रसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ‘फँड्री’ चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे न्यू आर्ट्सचा विद्यार्थी. त्याचा पहिलाच चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराच्या स्पर्धेत निश्चित नगरचे नाव उंचावेल. नगरला चांगले प्राध्यापक लाभले म्हणूनच ‘नागराज मंजुळे’ घडला. असे वेगळा दृष्टिकोन ठेवणारे आणखी गुणी दिग्दर्शक घडावेत, अशा शुभेच्छा शिंदे यांनी या वेळी दिल्या.


प्रास्ताविकात प्राचार्य भास्कर झावरे यांनी महोत्सव सुरू करण्यामागचा हेतू सांगितला. सूत्रसंचालन प्रा. संदीप गिर्‍हे यांनी केले, तर आभार राहुल चौधरी यांनी मानले. उपप्राचार्य एस. एस. जाधव, संज्ञापन अभ्यास विभागप्रमुख बापू चंदनशिवे, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य शिवाजी साबळे यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.


18 पर्यंत चालणार्‍या या महोत्सवात सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत जगातील नावाजलेले व दुर्मिळ चित्रपट दाखवले जातील. मंगळवारी लघुपटांची स्पर्धा होईल. विद्यार्थी विभागात 16 लघुपट व माहितीपटाचे स्क्रीनिंग होईल. सवरेत्कृष्ट लघुपट, सवरेत्कृष्ट कॅमेरामन व सर्वोत्कृष्ट एडिटर निवडून त्यांचा गौरव करण्यात येईल. या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध माहितीपटकार प्रसाद नामजोशी व सुशोभन पाटणकर करणार आहेत.


नगरच्या रसिकांना दुर्मिळ चित्रपटांची मेजवानी
आनंद पटवर्धन दिग्दर्शित ‘इन द नेम ऑफ गॉड’ (राम के नाम - माहितीपट), मायकल मूर दिग्दर्शित ‘फॅरेनाइट - नाइन इलेव्हन’ हा अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यावर आधारित माहितीपट, शिन्डलर्स लिस्ट (स्टीव्हन स्पीलबर्ग-ऑस्ट्रेलिया), लॉरेन्स ऑफ द अरेबिया (ग्रेट ब्रिटन), लाइफ इज ब्युटिफूल (जर्मनी), मेट्रोपोलिस (जर्मनी), उटोपिया (लॉरेल अँड हार्डी या जोडगोळीचा विनोदीपट) हे सिनेमे रसिकांना पाहायला मिळतील.