नगर- वर्षभरापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यावेळी "दिव्य मराठी'चा प्रतिनिधी म्हणून सदाशिव अमरापूरकर यांना भेटण्याचा योग आला. डॉ. दाभोलकर यांच्याविषयीच्या आठवणी ते सांगणार होते. शिंदे मळ्यात असलेल्या त्यांच्या नव्या घरी आमची भेट झाली. एवढ्या मोठ्या कलाकाराला भेटण्याची उत्सुकता होतीच, शिवाय दडपणही होते. प्रत्यक्ष भेट झाली, तेव्हा मात्र कलाक्षेत्राच्या शिखरावर पोहोचलेल्या या कलाकाराचे पाय जमिनीवर असल्याचे पाहून सुखद धक्का बसला.
डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली, तेव्हा अमरापूरकर नगरमध्ये होते. फोन करून त्यांची वेळ घेतली. "तुम्ही घरी पोहोचा, दहा-पंधरा मिनिटांत आलोच', असे त्यांनी सांगितले. फोन ठेवताच मी सहकाऱ्याबरोबर अमरापूरकर यांच्या घरी पोहोचलो. डोअरबेल वाजवताच अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदाताई यांनी दरवाजा उघडला. आम्ही येणार याची पूर्वकल्पना अमरापूरकर यांनी त्यांना दिली असावी. आम्ही दबकतच घरात प्रवेश केला. सुनंदाताई व त्यांची मुलगी रिमा यांनी आम्हाला अगत्याने बसण्यास सांगत पाणी दिले. "तुम्ही बसा. साहेब येतीलच एवढ्यात', असे म्हणत डॉ. दाभोलकर यांच्याबद्दल त्या सांगू लागल्या. तेवढ्यात अमरापूरकर आले. आम्ही उठून उभे राहिलो, तर ते मोठ्या आस्थेने म्हणाले, "अरे, पोरांनो बसा, मला वेळ नाही ना झाला...' त्यांचे हे शब्द ऐकून क्षणभर काय बोलावे तेच सुचेना. ते सावकाश सोफ्यावर बसले. त्यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. पायासह संपूर्ण अंगावर सूज होती. ते विसावल्यानंतर आम्ही बोलायला सुरूवात केली. डॉ. दाभोलकर यांच्याविषयी ते भरभरून बोलायला लागले. त्यांची अशी अचानक हत्या झाल्याची चीड अमरापूरकर यांच्या बोलण्यातून जाणवत होती. पाऊण तास ते बोलत होते. ते एवढ्या
आपुलकीने बोलत होते, की आपण एका महान कलाकाराशी बोलत आहोत, असे जाणवले नाही. निघताना आमच्या पाठीवर हात ठेवत ते म्हणाले, "चांगले काम करा'. आम्ही "हो सर' म्हणत घराबाहेर पडलो. डोक्यात एकच विचार सुरू होता, कलाक्षेत्राच्या शिखरावर पोहोचलेल्या या महान कलाकाराचे पाय मात्र अजून जमिनीवरच आहेत....