आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Literature News In Marathi, Mangesh Tendulkar, Divya Marathi, Nagar

साहित्य: मानसिक उत्क्रांतीसाठी कठोर आत्मपरीक्षण करा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कविता ही शब्दांतून, तसेच शिल्पांतून, चित्रकलेतून व व्यंगचित्रांतूनही व्यक्त होते. सृष्टीच्या निर्मात्याने साहित्यिकांना जगात पाठवले. कारण त्यामागे माणसाला माणूस बनवण्याचा विचार होता. आपली शारीरिक उत्क्रांती झाली. आता आपण मनाने केव्हा उत्क्रांत होणार, याचे कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रविवारी येथे बोलताना केले.

मुंबई येथील आनंदघन प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या कवी संजीव तनपुरे यांच्या ‘लपवलेली वही’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तेंडुलकर बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, कवी रामदास फुटाणे उपस्थित होते.
फुटाणे म्हणाले, लपवलेल्या वहीतल्या कविता सर्वार्थाने वेगळ्या, तरल आणि विचार करायला लावणा-या आहेत. हल्ली राजकारण्यांची भडक भाषा ऐकून खळ्ळ-खट्याक प्रवृत्ती वाढीला लागली आहे. याचा गांभीर्याने विचार करावा लागणर आहे. त्यासाठी तालुका पातळीवर छोटी साहित्य संमेलने घ्यायला हवीत. हल्ली व्यंगच वास्तव म्हणून समोर येत आहे. अतिशयोक्ती व वास्तवातील अंतर कमी होते, त्या वेळी गंभीर परिस्थिती निर्माण होते, असेही ते म्हणाले.
गडाख म्हणाले, जन्मल्यापासून कविता आपल्यासोबत असते. कविता समजून घेणे हा प्रत्येकाचा स्वतंत्र भाग आहे. ज्याला माणसं वाचता येतात, त्याला कविता अधिक समजते. तरलता आणि तगमग यातूनच दुसरी कविता जन्म घेते. कवी, चित्रकार, प्रकाशक यांच्या एकरूपतेचे दर्शन या काव्यसंग्रहातून होते, असे सांगत त्यांनी कवी तनपुरे यांचे कौतुक केले.
या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन योगेश अनासपुरे यांनी केले. आभार शशिकांत तांबे यांनी मानले.
या कार्यक्रमाला नगर शहर व जिल्ह्यातील साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.