आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटांमुळे ‘दुनियादारी’, ‘शाळा’च्या मागणीत मोठी वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेताच त्या चित्रपटाची कथा ज्या मूळ पुस्तकातून घेतली गेली, ते पुस्तक विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. ‘दुनियादारी’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच सुहास शिरवळकर लिखित ‘दुनियादारी’ या कादंबरीच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. ‘दुनियादारी’साठी नगरमध्ये नोंदणी सुरू आहे. ‘शाळा’ चित्रपटाच्या यशानंतर मिलिंद बोकीलांच्या ‘शाळा’ कादंबरीलाही मागणी वाढली आहे.

दज्रेदार कथानकासह उत्तम चित्रीकरण व ओठांवर रेंगाळणारी गाणी असली की, मराठी चित्रपटही प्रेक्षक डोक्यावर घेतात हे दुनियादारी, शाळा या चित्रपटांनी दाखवून दिले. रसिक अजूनही मराठी चित्रपटांवर प्रेम करतो हे दुनियादारी चित्रपटाने सिद्ध केले. या चित्रपटाला तरुणाईसह वयोव़ृद्धांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. महाविद्यालयीन जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील संस्मरणीय कालावधी असतो. कॉलेजकट्ट्यावर बसून मित्र-मैत्रिणींची केलेली टिंगलटवाळी, त्यातून निर्माण झालेली नाती, मनातील ओठांवर न आल्याने पाहता पाहता दूर गेलेली मैत्रीण, ग्रुप-ग्रुपमधील वाद, लेक्चरला दांडी मारत कँटीनमध्ये घालवलेला तो वेळ.. या एक ना अनेक कॉलेजमधील कडू-गोड आठवणी प्रत्येकाच्या हृदयात आजही तितक्याच ताज्या आहेत. कॉलेज जीवनातील कडू-गोड प्रसंगांवर आधारित दुनियादारी कादंबरी सुहास शिरवळकरांनी 1982 मध्ये प्रसिद्ध केली. वाचकांनी तिला डोक्यावर घेतले. या कादंबरीवर आधारित दुनियादारी चित्रपटाला प्रदर्शनाच्या दिवसापासूनच प्रेक्षकांची पसंती मिळाली.

चित्रपट ज्यावरून बेतला आहे, त्या दुनियादारी कादंबरीला वाचकांची मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे. मिलिंद बोकील यांची शाळा कादंबरीची पहिली आवृत्ती 14 जून 2004 रोजी प्रकाशित झाली. 19 वी आवृत्ती 2013 मध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीवर आधारित शाळा चित्रपटालाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

महिन्यात शंभर प्रतींची विक्री
पूर्वी महिन्यातून पाच ते सहा ‘दुनियादारी’ विकल्या जायच्या. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 3-4 दिवसांतच कादंबरीची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली. आता महिन्याला शंभर पुस्तकेही पुरत नाहीत. आम्ही मागणी करतो, तेवढी पुस्तके मिळत नाहीत. त्यामुळे आगाऊ नोंदणी करावी लागत आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात या कादंबरीचा तुटवडा होता. दररोज 10 ते 15 वाचक कादंबरीची मागणी करतात.दुनियादारी आणि शाळा या चित्रपटांच्या यशानंतर या कादंबर्‍यांकडे वाचकांचा कल वाढला आहे.
- वाल्मिक कुलकर्णी, उदय एजन्सी, शनीचौक, नगर.