आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi News In Medical Field, Nagar, Divya Marathi

शल्य चिकित्सकांनी परस्पर नियुक्त केले वैद्यकीय अधिकारी व अधीक्षकांची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आरोग्य संचालकांच्या आदेशाने नियुक्त होणार्‍या वैद्यकीय अधिकारी व अधीक्षकांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी परस्पर प्रतिनियुक्ती दिल्याचा प्रकार उघडकीस आला. एका ठिकाणची सोय करताना इतर ठिकाणी गैरसोय होत असल्याकडे यात सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले.


कुशल मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी प्रतिनियुक्त्या देऊन ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी असणार्‍या डॉक्टरांना जिल्हा रुग्णालयात पाचारण करण्यात येते. अस्थिरोग विभागात सध्या डॉ. प्रभास पाटील हे एकमेव स्थायी वर्ग एकचे वैद्यकीय अधिकारी आहेत. या विभागात किमान चार तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. बुधवारी अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गर्दी होते. डॉक्टरवर अतिरिक्त ताण येत असल्याचे कारण दाखवून तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर या विभागासाठी प्रतिनियुक्तीवर डॉक्टर नियुक्त केले. डॉ. सुनील पोखरणा यांची जून 2013 मध्ये या विभागात आठवड्यातून तीन दिवसांसाठी नियुक्ती करण्यात आली. पारनेर रुग्णालयातही त्यांची सेवा घेण्यात येत आहे. या रुग्णांची सोय पाहताना डॉ. पोखरणा यांची नियुक्ती असलेल्या चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयाकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्त असलेले डॉक्टर परत पाठवावेत, अशी मागणी चिचोंडी पाटील ग्रामस्थांकडून होत आहे.


बदल्यांचे अधिकार असणार्‍या अधिकार्‍यांकडून प्रतिनियुक्तीचे आदेश निघणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावर परस्पर निर्णय घेऊन प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.


सेवेवर परिणाम होणार नाही ..
मनुष्यबळाभावी रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याने आठवड्यातून दोन-तीन दिवस प्रतिनियुक्तीवर डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणच्या सेवेवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेऊन ही नियुक्ती दिली जाते. याबाबत उपसंचालक, संचालकांनी माहिती कळवली जाते. ’’ डॉ. पी. एस. कांबळे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक.


माझ्यावरील आरोप वैयक्तिक आकसातून : डॉ. पोखरणा
जिल्हा रुग्णालयातील डॉ. सुनील पोखरणा यांनी सोमवारी आपल्यावर असलेल्या आक्षेपांचा ‘दिव्य मराठी’कडे खुलासा केला. ते म्हणाले, माझी नियुक्ती नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे असताना जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशाने जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्ती झाली. कारण येथे हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी जादा तज्ज्ञांची आवश्यकता होती. गेल्या जूनपासून (2013) जानेवारीपर्यंत मोठय़ा 172 पैकी 83, तर लहान 184 पैकी 108 अशा 191 शस्त्रक्रिया मी केल्या आहेत. त्यांच्या सर्व नोंदी उपलब्ध आहेत. त्यानंतर परत पारनेरचा अतिरिक्त भार माझ्याकडे सोपवण्यात आला. तेथील कार्यालयीन त्रुटी दूर करून तेथील कारभार मी सुरळीत केला. माझ्यासह राज्यातील सुमारे 95 टक्के सरकारी डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. ज्या दिवशी न्यायालय याबाबत काही निर्णय देईल, त्यानुसार आम्हीही निर्णय घेऊ. आपल्यावर झालेल्या बदलीच्या कारवाईबाबत खुलासा करताना ते म्हणाले, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आठवले यांनी केलेली कारवाई वैयक्तिक आकसातून आहे. शालेय आरोग्य शिबिरात एका तज्ज्ञाने केलेल्या शस्त्रक्रियेची देयके जिल्हा रुग्णालयाने दिली नाहीत. त्यामुळे त्यांनी पुढील शिबिरे रद्द केली. त्याचा ठपका माझ्यावर ठेवण्यात आला. पदोन्नतीच्या यादीत नाव असल्याने चिचोंडी ग्रामीण रुग्णालयात माझी नियुक्ती झाली. यात कोणाचाही वरदहस्त नव्हता, असे डॉ. पोखरणा यांनी सांगितले.


पदांबाबत पाठपुरावा
रिक्त पदांची माहिती शासनाला वेळोवेळी कळवली आहे. दर महिन्याला याबाबत रिक्त पदांची माहिती कळवून ही पदे भरण्याबाबत शासनाला अवगत केले आहे. पदोन्नतीच्या माध्यमातून येत्या महिनाभरात रिक्त पदांमधील काही पदे भरण्याची शक्यता आहे.’’ संजय राठोड, प्रशासन अधिकारी.