आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी संशोधन केंद्रामुळे विद्यार्थी होतोय समृद्ध - काळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - इंग्रजी शाळांचे वाढते प्रमाण हे मराठीचे महत्त्व कमी होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषेच्या वापरासाठी आपण अाग्रही राहिलो पाहिजे, तरच आपल्या वैभवशाली मराठीची जपवणूक होईल. सारडा महाविद्यालयात मराठी संशोधन केंद्र मराठी भाषेचा जपवणुकीसाठी चांगले प्रयत्न करत आहेत. गुणवान अभ्यासू प्राध्यापक विद्यार्थ्यांना लाभले आहेत. मराठी संशोधन केंद्रामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका प्रा. मेधा काळे यांनी केले.

सारडा महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्रातर्फे आयोजित मराठी राज्यभाषा दिनानिमित्त कार्यक्रमात प्रा. काळे बोलत होत्या. प्राचार्य प्रा. डॉ. अमरजा रेखी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास मराठी संशोधन केंद्राच्या समन्वयक प्रा. डॉ. माहेश्वरी गावित, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, प्रबंधक अशोक असेरी, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रतीक्षा गायकवाड, प्रा. डॉ. संगीता शेळके, प्रा.डॉ. मच्छिंद्र वाळूंजकर, प्रा. डॉ. संगीता शेळके, प्रा. डॉ. प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

प्रा. काळे म्हणाल्या, आपल्याकडे अनेक दिन साजरे करण्याची पद्धत सुरू झाली आहे. एखाद्याचे महत्त्व प्रास्तापित व्हावे, म्हणून दिन साजरे केले जातात. मराठी भाषेचीही हीच परिस्थिती आहे. म्हणूनच मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळावा. यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रास्ताविक डॉ. गावित यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुरेश भट, फ. मुं. शिंदे, मंगेश पाडगावकर, आनंद यादव आदींच्या कविता सादर केल्या. सूत्रसंचालन धैर्यशिला कळमकर संतोष भागवत यांनी केले, तर आभार मनीषा शिरसाठ यांनी मानले.

भाषा संपर्काचे माध्यम
मराठी भाषा टिकवण्याची वाढवण्याची जबाबदारी फक्त राज्य सरकारची नाही, तर प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेचा विकास, प्रचार प्रसार करुन ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी. भाषा ही संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे जेवढे तुम्ही स्पष्ट प्रभावी बोलाल तेवढे तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलते, असे डॉ. रेखी म्हणाल्या.