नगर- पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने भाजी विके्रत्यांनी शहरातील विविध भागांतील प्रमुख रस्त्यांवर पथाºया मांडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. भाजी विके्रत्यांच्या पुनर्वसनाबाबत महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून चालढकल करत आहे. नेहरू मार्केटच्या बांधकामाचे भिजत घोंगडे, गंजबाजारातील महात्मा फुले भाजी मार्केटची झालेली दुरवस्था, तसेच वारंवार होणाºया अतिक्रमण हटाव कारवाईमुळे भाजी विके्रते हवालदिल झाले आहेत. पर्यायी जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना नाइलाजास्तव रस्त्यावर बसूनच भाजी विक्री करावी लागत आहे.
सायंकाळचे पाच वाजले की, भाजी विक्रेते ठरावीक रस्ता व जागेवर पथारी मांडतात. कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी त्यांना ही उठाठेव दररोज करावी लागते. रस्त्यावर पथारी मांडल्याने कधी कारवाई होईल, याची भीती त्यांच्या मनात असते, पण उत्पन्नाचे दुसरे कोणतेच साधन नसल्याने भाजी विकली नाही, तर कुटुंब कसे चालणार, याची चिंता प्रत्येकाच्या चेहºयावर दिसते. महापालिका व वाहतूक पोलिस भाजी विके्रत्यांवर कारवाई करून त्यांना पिटाळून लावतात. वारंवार अशी कारवाई करण्यापेक्षा त्यांच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी मात्र कोणीच प्रयत्न करत नाही. महापालिकेने चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केटची इमारत पाडून जवळपास तीन वर्षे उलटली तरी या जागेवर नवीन भाजी मार्केट उभे राहिलेले नाही. हक्काची इमारत पाडल्याने भाजी विके्रते रस्त्यावर आले. आज ना उद्या नेहरू मार्केटची इमारत उभी राहील, ही आशा भाजी विक्रेत्यांना आहे.
गंजबाजारातील महात्मा फुले भाजी मार्केटची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने तेथे ग्राहक येत नाहीत. त्यामुळे अनेक भाजी विक्रेत्यांना ही जागादेखील सोडावी लागली. हे भाजी विके्रते आता चितळे रस्ता, माळीवाडा, वाडिया पार्क, दिल्लीगेट वेस, भिस्तबाग नाका, प्रोफेसर कॉलनी चौक, अमरधाम, नवनागापूर यासारख्या भागात भाजी विक्री करत आहेत.
मात्र, त्यांच्या या व्यवसायामुळे शहरातील वाहतुक विस्कळीत होत आहे. रस्त्याच्या कडेला बसणाºया भाजी विक्रेत्यांमुळे वाहनचालक व पादचाºयांना रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत. ग्राहकही चक्क गाडीवर बसून चालता-चालता भाजी खरेदी करतात. त्यामुळे सायंकाळनंतर अनेक रस्त्यांना चक्क एखाद्या आठवडे बाजाराचे स्वरूप येते.
नेहरू मार्केटच्या नव्या इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करावे, तसेच इतर ठिकाणच्या भाजी विके्रत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी भाजी विके्रते संघटना महापालिका प्रशासनाकडे वारंवार करत आहे. परंतु प्रशासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने भाजी विक्रेते हवालदिल झाले आहेत. इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेवर बसण्यास भाजी विके्रत्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी मनपाकडे काही दिवसांपूर्वी केली होती, परंतु मनपा प्रशासनाने त्यास नकार दिला. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना नाईलाजास्तव रस्त्यावर पथारी मांडावी लागत आहे. मात्र, त्यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होत आहे.
आंदोलनाशिवाय पर्याय नाही
नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेवर बसण्यास भाजी विक्रेत्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी आयुक्तांकडे काही दिवसांपूर्वी केली. मात्र, अजून परवानगी मिळालेली नाही. पत्र्याचे कुंपण तसेच लाइटची व्यवस्था करून परवानगी देऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. परंतु काहीच झाले नाही. आचारसंहिता संपताच आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार आहे.’’ संजय झिंजे, अध्यक्ष, हातगाडी व भाजी विक्रेता संघटना, चितळे रस्ता.
कोंडीला आम्ही जबाबदार नाही
शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्याचे खापर भाजी विक्रेत्यांवर फोडले जाते. ज्या ठिकाणी भाजी विक्रेते बसत नाहीत अशा ठिकाणीदेखील वाहतूक कोंडी होतेच. मग प्रत्येक वेळी आम्हालाच जबाबदार का धरण्यात येते? वाहतूक पोलिस व मनपा वारंवार कारवाई करून आम्हाला वेठीस धरतात, त्यापेक्षा आम्हाला जागा दिली तर बरे होईल.’’
वंदना शिंदे, भाजी विक्रेत्या